हैदराबाद, 14 ऑक्टोबर : पावसानं महाराष्ट्र आणि हैदराबादमधील अनेक भागांत हाहाकार पसरला आहे. रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे गाड्या वाहून गेल्या आहेत तर घरांमध्ये पाणी शिरलं आहे. पुरात नागरिक अडकल्यानं त्यांचं NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारनं दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की डोळ्यादेखत एका क्षणात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात इमारत वाहून गेली आहे. अवघ्या 2 ते 3 सेकंदात संपूर्ण इमारत पाण्यात कोसळली. या इमरतीमध्ये कोणी अडकलं होतं का? कुणी जखमी आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. पावसाचं गेल्या दोन दिवसांपासून धुमशान सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तेलंगणा, आंध्र प्रदेशात नुकसान झालं आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मुसळधार पाऊस पडत आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यात रेड अलर्ट आणि 2 जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान संपूर्ण हैदराबादमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. आता नागरिकांच्या वस्त्यांमध्ये मगरी आणि साप या पाण्यासोबत घुसायला लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावऱण आहे.
अनेक भागांमध्ये खूप पाणी साचलं आहे आणि नदीसारखा प्रवाह असल्यानं पाण्याचा वेग जास्त आहे. या पाण्यासोबत नागरिक वाहून जात असताना त्यांना रेस्क्यू करत असल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.