संदीप मिश्रा, प्रतिनिधी सीतापूर, 26 जून : अनेकदा लग्नात हुंड्यावरुन तसेच दागिन्यांरुन वर आणि वधू पक्षामध्ये वाद झाल्याचे तुम्ही वाचले असेल किंवा ऐकले असेल. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दागिन्यांवरून वधू-वरांमध्ये वाद झाला आणि या वादामुळे वधूने लग्न रद्द केले. तर यानंतर वराने पोलीस ठाण्यात धाव घेऊ याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या सीतापुर येथे घडली. करण असे वराचे नाव आहे. अटारिया पोलीस स्टेशन हद्दीतील शाहजहानपूर गावातून गेल्या शुक्रवारी त्याची वरात सीतापूर गावात आली. लग्नात सहभागी झालेल्या वऱ्हाडींनी जोरदार नृत्य केले आणि जेवणही केले. वर करण लग्नासाठी खूप उत्सुक दिसत होता. दरम्यान, वधू पक्ष आणि वर पक्षात वधूसाठी आणलेल्या दागिन्यांवरून वाद झाला.
वधूपक्षाने केला हा आरोप - वराच्या बाजूने आणलेले दागिने अतिशय हलके आहेत, असा आरोप वधू पक्षाने करत त्यांनी लग्नास नकार दिला. लग्नासाठी त्यांना उपस्थितांनी विनंती केली. मात्र, त्यांनी कुणाचेही ऐकून घेतले नाही. तसेच त्यांनी आपला निर्णयही बदलला नाही. यानंतर वर बाजूने नैमिषारण्य पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांना हे लग्न लावून देण्याची विनंती केली. याप्रकरणी वराने सांगितले की, लग्नाच्या आधी वधूपक्षाने वधूसाठीचे दागिने मागितले. मात्र, दागिन्यांचे वजन कमी असल्याने त्यांनी पुढील विधीसाठी नकार दिला. तसेच दिलेले दागिने वधू पक्षाने परत केले नाही, असे वराने म्हटले आहे. याप्रकरणी ASP एनपी सिंह यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांची पोलीस ठाण्यात चर्चा सुरू आहे. तर जेव्हा लग्न ठरले होते, तेव्हा लग्न लावणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, मुलाच्या वडिलांकडे 12 बिघे जमीन आहे, परंतु मुलाच्या वडिलांकडे फक्त 6 बिघे जमीन आहे, असे वधू पक्षाने सांगितल्याचे एनपी सिंह यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.