नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने रविवारी दिवसभर एक मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये आगामी पाच राज्यांच्या निवडणुका जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देखील जवळपास चार तास या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीच्या माध्यमातून आगामी काळात निवडणूक होणाऱ्या पाचही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा सरकार कसे येईल याचा मंत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दिवसभर राजधानी दिल्लीतील एन डी एम सी कन्वेंशन सेंटरमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील प्रदेशाध्यक्ष सोबतच राष्ट्रीय सरचिटणीस आणि भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये आगामी पाच राज्यांमध्ये असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात विस्ताराने चर्चा करता आली. महत्त्वाचं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये यावेळी भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी सर्व ते प्रयत्न करण्याचा आणि बंगाली जनतेच्या मनात उतरण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मिशन हातात घ्यावं, हे मिशन सत्ताप्राप्तीसाठी नाहीतर देशाला मोठं करण्याकरिता असावं असं बैठकीत ठरविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
देशाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण तयार करून सर्व कार्यकर्त्यांनी नेशन फर्स्ट या पद्धतीने देशाला पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे असे बैठकीमध्ये पंतप्रधानांनी सांगितलं, असं भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केलं आहे. सोबतच बैठकीमध्ये शेती कायद्याच्या संदर्भात सर्वसामान्यांची जाणीव जागृती करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पक्षांमध्ये सर्वसामान्यांची सहभागिता वाढावी यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी पक्षाने सर्व समाजातील वर्गाला जोडावे यासाठी देशभरात संपर्क अभियान चालविण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. सोबतच दिवसभर चाललेल्या या बैठकीमध्ये महाराष्ट्रासह विविध प्रदेशाच्या प्रदेशाध्यक्षांनी राज्याचा अहवाल देखील मांडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, BJP, Narendra modi