जयपूर 13 ऑगस्ट: राजस्थानमधल्या काँग्रेस सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव आणणार असल्याची घोषणा भाजपने आज केली. त्यामुळे राज्यातल्या अशोक गहेलोत सरकारचा जीव टांगणीला लागला आहे. शुक्रवारपासून राज्यात विधानसभा अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने ही घोषणा केल्याने खळबळ उडाली असून पक्षाला पायलट मिळाले असले तरी सरकारची नौका तरणार की बुडणार हे आता लवकरच कळणार आहे. भाजपचे नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी आज ही माहिती दिली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सचिन पायलट यांनी सध्यातरी बंडाची तलवार म्यान केली आहे. त्यामुळे काँग्रेस सरकारचा धोका टळला असं वाटत असला तरी असंतोष पूर्णपणे शमलेला नाही असं म्हटलं जात आहे. त्यामुळे येणारे काही दिवस हे काँग्रेससाठी धोक्याचे ठरणार आहेत.
Jaipur: Congress leader Sachin Pilot reaches CM Ashok Gehlot's residence, to attend Congress Legislature Party meeting, ahead of the special session of the #Rajasthan Assembly tomorrow. https://t.co/uF4RH5FHuz pic.twitter.com/eydF757veX
— ANI (@ANI) August 13, 2020
सचिन पायलट यांच्याकडे 25 समर्थक आमदार आहेत. बंड शांत झालं असं वाटत असलं तरी ते काय भूमिका घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसने आपले सगळे आमदार एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवले आहेत. तर भाजपने आपल्या आमदारांना गुजरातमध्ये हलवलं आहे. त्यामुळे अविश्वासाच्या प्रस्तावावर सभागृहात नेमकं काय घडतं यावरच गेहलोत सरकारचं भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर सचिन पायलट यांनी आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि चर्चा केली.