नवी दिल्ली 27 डिसेंबर: शेतकरी आंदोलनाचा प्रश्न आता चिघळला आहे. राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तर आता भाजपकडूनही राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा (Jagat Prakash Nadda) यांनी लोकसभेतल्या राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत ढोंगीपणाचा आरोप केलाय. या आधी जी भूमिका तुम्ही घेतली होती ती भूमिता आता का बदलत आहात असा सवाल नड्डा यांनी केलाय. आता यापुढे ही ढोंगबाजी चालणार नाही देशातल्या जनतेने तुमचा दुटप्पीपणा पाहिला आहे असंही ते म्हणाले. नड्डा यांनी दोन दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी आधी काय भूमिका घेतली होती ते दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण करताना अमेठीतल्या बटाटा उत्पादक शेतकऱ्याचं उदाहरण देत त्यांना आपला माल थेट कंपन्यांना विकता आला पाहिजे, दलालांचं वर्चस्व संपलं पाहिजे अशी भूमिका मांडली होती.
आता सरकार नव्या कृषी विधेयकांच्या माध्यमातून तीच भूमिक घेत असल्याचं नड्डा यांनी सांगितलं आहे. आता केवळ राजकारण करण्यासाठी तुम्ही दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केली. देशातली जनता तुम्हाला चांगली ओळखून आहे आता खोटारडेपणा करू नका असंही त्यांनी राहूल गांधी यांना बजावलं आहे.