मुंबई, 24 जानेवारी : थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांच्या 125 व्या जयंती वर्षाला शनिवारी सुरुवात झाली. देश स्वतंत्र होऊन सात दशकं उलटली आहेत, तरीही सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचा वाद कायम आहे. या विषयावर आजपर्यंत भारत सरकारनं तीन चौकशी आयोग नेमले होते. या आयोगांच्या अहवालात विसंगती असल्याचा दावा अनेक अभ्यासकांनी केला आहे. त्यामुळे नेताजींच्या मृत्यूचा दिवस आणि कारणाबद्दल अनेकांच्या मनात आजही संभ्रम आहे.
भाजपा खासदाराचा आरोप
वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमीच प्रसिद्ध असलेले भाजपा (BJP) खासदार साक्षी महाराज (Sakshi Maharaj) यांनी या विषयावरही एक खळबळजनक आरोप केला आहे. सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसच्या एका नेत्यानं केली, असा आरोप त्यांनी केला आहे. साक्षी महाराज उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) उन्नाव या त्याच्या मतदारसंघातील एका कार्यक्रमात बोलत होते.
काय म्हणाले साक्षी महाराज?
“सुभाषचंद्र बोस यांना अकाली मारण्यात आलं. माझा आरोप आहे की, काँग्रेसच्या लोकांनीच त्यांची हत्या केली. सुभाषचंद्र यांची लोकप्रियता पंडित नेहरु आणि महात्मा गांधी यांच्यापेक्षा जास्त होती,’’ असा वादग्रस्त आरोप साक्षी महाराज यांनी केला आहे.
‘इंग्रज साधे नव्हते’
साक्षी महाराज यावेळी बोलताना पुढे म्हणाले की,”इंग्रज इतके साधे नव्हते. सुभाषचंद्र बोस यांनी ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दुंगा’, अशी घोषणा केली होती. रक्ताचं बलिदान देऊनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे.’’
#WATCH | "My allegation is that Congress got Subhash Chandra Bose killed....Neither Mahatma Gandhi nor Pandit Nehru could stand in front of his popularity," said BJP MP Sakshi Maharaj in Unnao yesterday pic.twitter.com/gaJJ6Le4j6
— ANI UP (@ANINewsUP) January 24, 2021
पराक्रम दिवस साजरा!
सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्तानं भारत सरकारनं 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकातामधील कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याचबरोबर मोदी सरकारमधील मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांनी देखील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नेताजींना श्रद्धांजली वाहिली.