नवी दिल्ली, 14 जानेवारी: देशातील काही राज्यांमध्ये पसरलेल्या बर्ड फ्ल्यूमुळे (Bird Flu) सध्या चिकनवर (Chicken) संक्रांत कोसळली आहे. मांसाहार करणाऱ्या लोकांनी चिकनकडे पाठ फिरवली असून त्याचा फटका पोल्ट्री फार्म धारकांना (Poultry Farmers) बसत असून, कवडीमोल भावानं किंवा अक्षरशः फुकट कोंबड्या वाटण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. खरं तर दिल्ली आणि परिसरातलं पोल्ट्री मार्केट उघडण्याचे आदेश मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत. चाचणीसाठी दिलेल्या कोंबड्यांच्या सँपलचा अहवाल निगेटिव्ह (Avian Influenza) आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतली गाझिपूर आणि इतर बाजारात पुन्हा चिकन विक्री खुली होणार आहे. अगोदर सर्व परिसरातल्या रेस्टॉरंट्स आणि इतर मोठ्या चिकनच्या ऑर्डर रोखून धरण्यात आल्या होत्या. दिल्लीत आणि हरियाणात बर्ड फ्लूच्या संसर्गानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. पण दिल्लीतल्या पोल्ट्री सँपल्समध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळला नाही. त्यामुळे चिकन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्यापूर्वी मात्र दिल्ली, हरयाणा परिसरात तर दोन विशिष्ट जातीच्या चिकनचे भाव किलोला 20 ते 25 रुपये इतके खाली आले आहेत, तरीही ग्राहक हे चिकन विकत घेण्यास तयार नाहीत. त्यामुळं दर आणखी कमी करून विक्री करण्याची तयारी पोल्ट्री फार्मधारकांनी केली आहे. तरीही विक्री न झाल्यास या कोंबड्या फुकट वाटण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. कारण पोल्ट्री फार्मधारक या कोंबड्या आणखी 4 ते 6 दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू शकणार नाहीत. त्यामुळे पोल्ट्री फार्मधारक सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पोल्ट्री फार्मधारकांनी, बर्ड फ्ल्यूचा जिथं काही परिणाम नाही तिथं या कोंबड्यांची विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सरकारकडं केली होती. ती दिल्ली सरकारने मान्य केली आहे,
हरियाणामधील जिंद इथल्या युनिटी पोल्ट्री फार्मचे अरुण सिंग म्हणाले, ‘अंडी देणाऱ्या लेयर कोंबडीचे दर प्रति किलो 25 रुपये झाला आहे. त्याचबरोबर पिल्लांची पैदास करण्यासाठी ज्या कोंबड्यांची अंडी वापरली जातात त्या कोंबड्यांचा दरही आता 20 रुपये किलोवर आला आहे. अन्यथा या हंगामात 60 ते 70 रुपये किलो दरानं या कोंबड्यांची विक्री होते. बर्ड फ्ल्यूच्या संसर्गामुळं चिकनवर बंदी घातल्यानं या उद्योगावर मोठं संकट कोसळलं आहे.’ स्वस्त दरात विक्री करावी लागेल किंवा फुकट वाटाव्या लागतील : पोल्ट्री उद्योगातील तज्ज्ञ अनिल शाक्य यांच्या मते, ‘अंडी देणाऱ्या लेयर कोंबड्यांचा अंडी देण्याचा एक ठराविक कालावधी असतो. तो कालावधी जसजसा संपत येतो तसतशा या कोंबड्यांचं अंडी घालण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं. एक वेळ अशी येते की या कोंबड्याचं अंडी देणं बंद होतं; पण या कोंबड्या दिवसाला 100 ते 125 ग्रॅम खाद्य खाते. त्यामुळं या कोंबड्याचं अंडी घालण्याचं प्रमाण 60-70 टक्के कमी होतं तेव्हा त्यांची विक्री केली जाते. ज्या कोंबड्या पिल्लांच्या पैदाशीसाठी वापरल्या जातात त्यांच्याबाबतही हीच परिस्थिती आहे.’ याबाबत एका रेस्टॉरंटचे मालक असलेले हाजी अखलाक म्हणाले, ‘तंदुरी-टिक्का, फ्राय चिकन अशा पदार्थासाठी ब्रॉयलर कोंबडी जास्त वापरली जाते कारण अंडी देणाऱ्या कोंबडीपेक्षा ब्रॉयलर कोंबडीचे मांस अधिक नरम असते. चिकनच्या अन्य पदार्थामध्ये अंडी देणारी कोंबडी सहज खपते. तिचा दरही कमी असतो त्यामुळे ढाबे, हॉटेल्समध्ये या कोंबडीला मोठी मागणी असते; पण सध्या सरकारनं यावर बंदी घातल्यानं कोणीही विचारत नाही.’