Home /News /national /

सहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या खात्यात रातोरात जमा झाले कोट्यवधी रुपये, मिनी स्टेटमेंट तपासल्यावर झाला खुलासा

सहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या खात्यात रातोरात जमा झाले कोट्यवधी रुपये, मिनी स्टेटमेंट तपासल्यावर झाला खुलासा

ज्यांच्या खात्यात पैसे चुकून जमा झाले आहेत, अशांच्या बातम्यांचं प्रमाण तसं कमी असतं. ही बातमी या दुसऱ्या प्रकारातली आहे.

बिहार,16 सप्टेंबर: ऑनलाइन बँकिंग करताना चुकून पैसे भलत्याच अकाउंटला ट्रान्सफर झाल्याचे किस्से तुम्ही ऐकले असतील किंवा कदाचित स्वतःही अनुभवले असतील. बाकीच्यांना हे किस्से ऐकायला मजा येत असली, तरी ज्यांचे पैसे भलत्याच अकाउंटला गेलेले असतात, त्यांची मात्र पाचावर धारण बसलेली असते. सर्वसाधारणपणे अशा प्रकरणांमध्ये ज्यांचे पैसे भलतीकडे गेले आहेत, अशाच्याच बातम्या वाचायला मिळतात. ज्यांच्या खात्यात पैसे चुकून जमा झाले आहेत, अशांच्या बातम्यांचं प्रमाण तसं कमी असतं. ही बातमी या दुसऱ्या प्रकारातली आहे. बिहारमधल्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये अचानक कोट्यवधी रुपये डिपॉझिट झाले आहेत. हे पैसे कोणाचे आणि कोणाकडून आले, याचा अद्याप शोध लागलेला नाही; मात्र या प्रकारामुळे आता त्यांच्या गावातली प्रत्येक व्यक्तीच आपल्या खात्यातही चुकून असे पैसे जमा झाले आहेत का, हे पाहण्यासाठी बँकेत धाव घेत आहे. 'एनडीटीव्ही'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. बिहार राज्यातल्या कटिहारमधल्या आझमनगर इथल्या पस्तिया गावातली ही गोष्ट आहे. आसित कुमार आणि गुरुचरण विश्वास या सहावीत शिकणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांचं उत्तर बिहार ग्रामीण बँकेत खातं आहे. या दोघांच्या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. आसित कुमारच्या खात्यात सहा कोटी 20 लाख 11 हजार 100 रुपये, तर गुरुचरण विश्वासच्या खात्यात 90 कोटी 52 लाख 21 हजार 233 रुपये जमा झाले आहेत. या दोघांच्याही खात्यात पोशाख खरेदीसाठी, तसंच पुस्तकांच्या खरेदीसाठी पाचशे रुपये येतात. या वेळी मात्र काही तरी गडबड झाली आणि कोट्यवधी रुपये खात्यात जमा झाले आहेत.

पेन्शनधारकांसाठी खूशखबर! SBI च्या सेवेअंतर्गत घरबसल्या मिळतील सुविधा

हा प्रकार नेमका कसा झाला, याबद्दल अद्याप नेमकं कळलेलं नाही. पोशाखासाठीचे पैसे खात्यात जमा झाले आहेत का, हे तपासण्यासाठी हे दोघे विद्यार्थी आपल्या नातेवाईकांसह गावातल्या इंटरनेट केंद्रावर गेले होते. तिथे आपल्या खात्याचं मिनी स्टेटमेंट तपासल्यावर त्यात कोट्यवधी रुपये जमा झाल्याची बाब लक्षात आली. त्यांनी घरी जाऊन ही बाब कुटुंबीयांना सांगितली, तेव्हा तेही हे ऐकून अक्षरशः उडालेच. गावाच्या सरपंचांशी संपर्क साधला असता, त्यांनीही अशी घटना घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. काही जणांनी मात्र असं काही घडलं नसल्याचं सांगितलं. बँकेशी संपर्क साधण्यात आला असून, खात्यात असं काही दिसत नाहीये, असं त्यांचं म्हणणं आहे.

Air India चं खासगीकरण अखेरच्या टप्प्यात! Tata बरोबर याही कंपनीने लावली बोली

 ऑनलाइन बँकिंग करताना अकाउंट नंबर चुकल्यामुळे किंवा घाई-गडबडीमुळे हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता आहे. रक्कम खूप मोठी असल्यामुळे ती रक्कम जिथून आली आहे, त्या खातेदाराकडून त्याबद्दल योग्य ती कार्यवाही केली जाईल आणि मग ती रक्कम जिथे पाठवायची होती, तिथे पोहोचेल, अशी शक्यता आहे; मात्र तोपर्यंत अल्प काळासाठी का होईना, पण या दोन मुलांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोट्यधीश झाल्याचा फील घेतला.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Bihar, Money, Money debt

पुढील बातम्या