देशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्यंत जुना लोखंडी पूल अचानक नदीत कोसळला. यावेळी पूल पडल्यानंतर ट्रॅक्टर आणि प्रवाशांनी भरलेली रिक्षाही नदीत कोसळली. ही घटना अररियाच्या जोकिहाट प्रखंडच्या उदघाटची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर आणि रिक्षा पुलावरून जात असताना ब्रिटीश काळात बांधलेला लोखंडी पूल नदीत पडला.
या अपघातात डझनभराहून अधिक लोक बुडाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. अपघाताच्या 7 तासानंतर पूर्णिया इथली एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर बेपत्ता असलेल्या लोकांच्या मृतदेहाचा शोध सध्या सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या अपघातात 20 ते 25 लोक बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक मुफ्ती हसन आणि मो. तहसिन यांनी दिली आहे. या घटनेच्या वेळी एरिया एसडीपीओ पुष्कर कुमार यांच्यासह सर्व अधिकारी रात्री उशिरापासून घटनास्थळी हजर आहेत आणि बेपत्ता लोकांना शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पुलावर मोठ्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी होती. पण असं असूनही काही लोक जुन्या लोखंडी पुलावरून प्रवास करत होते.
या पुलाच्या शेजारी नवीन पूलही बांधण्याचं काम सुरू आहे. परंतु तो अद्याप पूर्ण झाला नाही. स्थानिक लोकांनी एकाच वेळी 3 लोकांना वाचवले पण आतापर्यंत एनडीआरएफच्या पथकाने एकालाही नदीतून बाहेर काढण्यात आलं नसल्याचं सांगण्यात येत आहे.