नवी दिल्ली, 19 जानेवारी: दरवर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणारा भव्य परेड सोहळा नेहमीच लक्षवेधी ठरतो. देशासह विदेशातील लोकांनाही याचं आकर्षण असतं. यावेळी मात्र एक व्यक्ती नव्यानंच सोहळ्यात आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे. या व्यक्तीचं नाव आहे भावना कांत. भावना या भारतीय वायुदलाच्या (Indian air force) फायटर पायलट दलामध्ये स्थान दिल्या गेलेल्या तिसऱ्या महिला (woman fighter pilot) आहेत. भावना यांना गेल्याच वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार दिला गेला.
भावना भारतीय वायुसेनेनं तयार केलेल्या देखावा-संचलनाचा एक भाग असतील. या देखाव्याची थीम 'मेक इन इंडिया'(make in India) अशी असणार आहे. भावना सांगतात, की त्यांना राफेल आणि सुखोईसोबतच इतरही विमानं उडवायला आवडतील. भारतीय वायुसेना यादरम्यान एलसीए तेजस, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, रोहिणी रडार, आकाश मिसाईल आणि सुखोई 30 एमकेआयचं प्रदर्शन लोकांसाठी ठेवणार आहे. भावना यांना प्रजासत्ताक दिनी ही संधी मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे.
भावना सांगतात, की मी दरवर्षी अगदी नेमानं प्रजासत्ताक दिनाचा भव्य संचलन सोहळा टीव्हीवर बघायचे. मला त्या सगळ्याबाबत खूप कौतुक आणि आकर्षण वाटत असे. आता मी स्वतः या संचलन परेडचा (republic day parade) भाग बनणार आहे हे माझ्यासाठी खूप खास आहे. भावना या मूळच्या बिहारच्या (Bihar) दरभंगा जिल्ह्यातील घनश्यामपूर भागातल्या बाऊर या लहानशा गावातल्या आहेत. भावनाचे वडील इंजिनियर आहेत.
भावना यांनी आपलं शालेय शिक्षण बरौनी रिफायनरी डीएव्ही पब्लिक स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी बंगळुरूच्या BMS इंजिनियरिंग महाविद्यालयातून मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स या विषयात इंजिनियरिंगची पदवी घेतली.