नवी दिल्ली 24 जून : देशातली सर्वात मोठी सरकारी टेलिकॉम कंपनी असलेली BSNL सध्या आर्थिक संकटातून जातेय. BSNLमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांचे पगार करायलाही कंपनीकडे पैसे नाहीत. जून महिन्याचा पगार कसा द्यायचा असा प्रश्न कंपनीच्या व्यवस्थापनाला पडला असून कंपनीने केंद्र सरकारकडे मदतीची याचना केलीय. खासगी कंपन्यांच्या आकर्षक जाहीराती, उत्तम सुविधा आणि वेगवान इंटरनेट यामुळे लोक झपाट्याने BSNL सोडून इतर कंपन्यांकडे वळत आहेत. त्यामुळे BSNLवर मोठं संकट ओढावलं आहे. प्रचंड मनुष्यबळ, गैरव्यवस्थापन आणि प्रचंड खर्च यामुळे कंपनीची परिस्थिती खालावली आहे. कंपनीला 13 हजार कोटींच देणं आहे. तर 2018 पर्यंत कंपनीला 90 हजार कोटींचा तोटा सहन करावा लागलाय. यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न कंपनीला पडलाय. BSNLला दरमहिन्याला कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला 850 कोटी लागतात. त्यामुळे जून महिन्याचे पगार करायला कंपनीकडे पैसेच नाहीत. कंपनीला जो महसूल मिळतो त्यातले 55 टक्के रक्कम ही फक्त पगारांवर खर्च होते. त्यात दरवर्षी वेतनाचा खर्च 8 टक्क्यांनी वाढतोय त्यामुळे BSNL सरकारसाठी पांढरा हत्ती ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत एक महत्त्वाची बैठक घेतली होती. त्यात BSNLच्या अध्यक्षांनी पंतप्रधानांसमोर एक सादरीकरणही केलं होतं. पण त्यानंतरही काहीही मार्ग निघाला नाही. तर कुठल्याही परिस्थितीत खासगीकरण करायचं नाही किंवा कर्मचाऱ्यांची कपातही करायची नाही असा पवित्रा कामगार संघटनांनी घेतलाय. त्यामुळे या संकटातून मार्ग काढण्यासाठी BSNLला मोठी कसरत करावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







