तिरुवनंतपूरम, 17 मार्च : जॅकपॉट लागल्यानंतर एका मजुराने थेट पोलीस स्टेशन गाठलं आहे आणि भलतीच डिमांड केली आहे. या मजुराची डिमांड ऐकून पोलीसही हैराण झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या एका मजुराला केरळमध्ये 75 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. ही लॉटरी लागल्यानंतर मजूर घाबरला आणि त्याने थेट पोलीस स्टेशनच गाठलं. लॉटरी चोरीला जायची भीती असल्यामुळे हा मजूर पोलिसांची मदत मागण्यासाठी गेला.
पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीचं नाव एसके बदेश आहे. केरळ सरकारची 75 लाख रुपयांची स्त्री शक्ती लॉटरी त्याने जिंकली. यानंतर बदेश आपल्या पुरस्काराच्या रकमेला सुरक्षा मिळावी म्हणून मंगळवारी रात्री उशीरा मुवत्तुपुझा पोलीस स्टेशनला गेला.
बदेशला लॉटरी जिंकल्यानंतरच्या कोणत्याही औपचारिकतेबद्दल माहिती नव्हती, त्यामुळे तो पोलिसांकडे सुरक्षा मागण्यासाठी गेला. एवढच नाही तर त्याला आपण जिंकलेलं लॉटरीचं तिकीट कुणीतरी काढून घेईल, याची भीती सतावत होती. घाबरलेल्या बदेशना मुवत्तुपुझा पोलिसांनी लॉटरी जिंकल्यानंतरच्या सगळ्या औपचारिकता सांगितल्या, एवढच नाही तर त्यांना पूर्ण सुरक्षा द्यायचं आश्वासनही दिलं.
एसके बदेश यांनी याआधीही अनेकवेळा लॉटरीचं तिकीट काढलं होतं, पण त्यांना कधीच लॉटरी लागली नव्हती. यावेळी मात्र त्यांना मोठा जॅकपॉट लागला आहे. केरळच्या या लॉटरीचा निकाल पाहण्यासाठी ते बसले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
एसके बदेश एर्नाकुलमच्या चोट्टानिकारामध्ये रस्ते बांधणीमध्ये मजूर आहेत. केरळमध्ये येऊन त्यांना फार दिवस झाले नाहीत, त्यामुळे त्यांना मल्ल्याळमही नीट बोलता येत नाही. लॉटरी जिंकल्यानंतर बदेश यांनी त्यांचा मित्र कुमारला मदतीसाठी बोलावलं. लॉटरीचे पैसे मिळाल्यानंतर एसके बदेश बंगालमध्ये परत जाणार आहेत. या पैशातून बदेशना त्यांचं घर रिनोवेट करायचं आहे, तसंच गावात जाऊन शेती करायचंही त्यांनी ठरवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.