मराठी बातम्या /बातम्या /देश /

भीक मागून गुजराण करणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी; वाचा नेमकं कारण काय?

भीक मागून गुजराण करणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी; वाचा नेमकं कारण काय?

Beggar

Beggar

कर्नाटकातील तो अवलिया भिकारी भीक म्हणून फक्त 1 रुपया (Only One Rupee ) घेत असे.

हुबळी,18 नोव्हेंबर:  भिकाऱ्याच्या (Beggar) मृत्यूनंतर झोपडीत लाखो रुपये सापडले, बँकेत मोठ्या ठेवी होत्या, अशा बातम्या अनेकदा आपण ऐकतो. लोकांकडून भीक मागून गोळा केलेले पैसे जमवून अनेक भिकारी गब्बर झाल्याचीही उदाहरणे आहेत. भिकाऱ्यांकडे बघण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन तुच्छतेचा असला तरी काही भिकारी मात्र आपल्या वेगळेपणामुळे लोकांचं लक्ष वेधून घेतात. लोकही त्यांना आपलंसं करतात. कर्नाटकातल्या (Karnataka) एका गावातला एक भिकारीही असाच आपल्या वेगळेपणामुळे लोकप्रिय बनला होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्ययात्रेला तब्बल तीन ते चार हजार नागरिक जमले होते. या भिकाऱ्याच्या लोकप्रियतेची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

'न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, हा अवलिया भिकारी हुविना हदगली गावात आणि आजूबाजूच्या परिसरात बसप्पा ऊर्फ हुच्चा बश्या (Huccha Bashya) म्हणून ओळखला जात होता. कन्नड भाषेत हुच्च म्हणजे वेडा. बसप्पा हा मानसिक रुग्ण होता. लहानपणीच त्याला हुविना हदगली (Hoovina Hadagali) बसस्थानकात सोडून देण्यात आलं होतं.

तो भीक म्हणून फक्त 1 रुपया घेत होता

अनाथ (Orphan) बसप्पा तेव्हापासून जवळपास 40 वर्षं या बसस्थानकाजवळच्या छोट्याशा शेडमध्ये रहात होता आणि भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होता. बसप्पा ऊर्फ हुच्चा बश्या म्हणून तो ओळखला जात असे. या भागातला तो एक 'प्रसिद्ध' भिकारी होता. हुविना हदगली बसस्थानकात येणाऱ्या अनेकांच्या तो ओळखीचा चेहरा होता.

त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो भीक म्हणून फक्त 1 रुपया घेत असे. त्यापेक्षा जास्त पैसे देण्याचा कोणी प्रयत्न केला तरी तो ते घेत नसे. त्यामुळेच तो सर्वांच्या लक्षात राहिला होता. तसंच इथल्या स्थानिकांमध्ये तो लकी चार्म म्हणजे शुभशकुनी (Lucky Charm) असल्याचा विश्वास होता. तो फक्त 1 रुपयाची मागणी करत असे आणि आशीर्वाद देत असे. त्याने कधीही कोणाला त्रास दिला नाही. लहानपणापासून तो या गावात राहत असल्यानं स्थानिकांशी त्याचं चांगलं नातं जुळलं होतं. अनेकदा लोक त्याला जेवणही देत असत.

सर्वांच्या तो चांगल्या परिचयाचा होता. त्यामुळे त्याला बसस्थानकातून हुसकून लावण्याचे आणि एखाद्या संस्थेत ठेवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडले होते, अशी माहिती हुविना हदगलीतील रहिवासी श्रीनिवास रेड्डी यांनी दिली. एकदा बसप्पा त्याच्या नियमित ठिकाणी दिसला नाही. तेव्हा लोक घाबरले आणि त्यांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. नंतर तो त्याच्या शेडमध्येच असल्याचं आढळून आलं. इतका तो लोकप्रिय होता, अशी आठवणही रेड्डी यांनी सांगितली. त्याचा मृत्यू (Death) होईपर्यंत तो या गावाचा एक अविभाज्य घटक होता. म्हणूनच दोन दिवसांपूर्वी त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराला (Funeral) हजारो नागरिक उपस्थित होते, असं रेड्डी यांनी नमूद केलं.

आठवडाभरापूर्वी बसप्पाला एका धावत्या बसने धडक दिली. त्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी गावात पसरताच नागरिक मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये जमा होऊ लागले. अनेक संस्था, दुकानदार आणि नागरिक पुढे आले आणि त्यांनी पैसे जमा करून त्याची अंत्ययात्रा काढली. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जवळपास 3 ते 4 हजार नागरिक उपस्थित होते. मानसिक रुग्ण असला तरी आपल्या निरागस, निरपेक्ष वृत्तीनं बसप्पानं सगळ्यांना जिंकून घेतलं होतं. म्हणूनच भिकारी असूनही त्याला लोकांचं इतकं प्रेम, सन्मान मिळाला. अशी घटना फारच दुर्मीळ असते.

First published: