अयोध्या, 21 जानेवारी : अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाचं (Ram Temple Construction) काम सुरु झालं आहे. राम जन्मभूमी (Ram Janmabhoomi) परिसरात 15 जानेवारीपासून पायाभरणीचं काम सुरु झालं आहे. हे मंदिर पुढील 1 हजार वर्ष कसं सुरक्षित राहील यासाठी एलएनटी आणि टाटा कन्स्ट्रक्शनचे सर्व इंजिनिअर्स सध्या काम करत आहेत.
कसं सुरु आहे काम?
प्रस्तावित राम मंदिरामध्ये 1200 खांब उभारण्याची योजना आहे. काही दिवसांपूर्वी या खांबांवर वजन टाकण्यात आलं त्यावेळी त्याच्या पायाशी असलेली जमीन काही इंच दबली गेली. त्यावेळी ती माती वाळूममिश्रित असल्याचं निष्पन्न झाले. या अडचणींवर मात करण्यासाठी मंदिराचे निर्माण हार्ड स्टोननं केलं जाणार आहे. यासाठी पायाच्या आतमध्ये जुन्या पद्धतीनुसार जवळपास 50 फुट खोल खड्डे खोदले जातील. पाया भरणीसाठी मिर्झापूरचे (Mirzapur) खास दगड वापरण्यात येत आहेत. या दगडांवर मंदिराची निर्मिती केली जाणार आहे.
या मंदिराच्या बांधकामाचं काम देशातील नऊ इंजिनिअरिंग इंस्टीट्यूटचे टॉप इंजिनिअर्स करत आहेत, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय यांनी दिली आहे. अयोध्या भवन निर्माण समितीचे संचालक नृपेंद्र मिश्रा यांच्यासमोर पायाभरणीचा आराखडा सादर करण्यात आला, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या विषयावर आज (गुरुवारी) अयोध्येतील सर्किट हाऊसमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मंदिर निर्माणाच्या कामातील प्रमुख इंजिनिअर्स आणि ट्रस्टचे पदाधिकारी सहभागी होतील.
“या मंदिराच्या निर्मितीसाठी आम्ही यापूर्वीच चार पर्यायांचा विचार केला होता. आता या चार पर्यायांमधील सर्वोत्तम पर्यायावर काम सुरु आहे ’’, असं राय यांनी स्पष्ट केलं. भारतामधील इंजिनिअर्स जगात अव्वल आहेत, त्यांनी केलेलं पायाभरणीचं काम थोड्याच दिवसात सर्वांसमोर असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.