आसाम, 20 मे: आसाममधील (Assam) पूरस्थिती गुरुवारी आणखीन गंभीर झाली आणि त्यात आणखी एकाचा मृत्यू झाला. राज्यातील 27 जिल्हे आणि येथील सुमारे 7.18 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (Assam State Disaster Management Authority) दैनिक पूर अहवालानुसार, नागाव जिल्ह्यातील (Nagaon District) कांपूर महसूल क्षेत्रात बुडून एकाचा मृत्यू झाला. याशिवाय कांपूरमध्ये आणखी दोन जण बेपत्ता आहेत, असे त्यात म्हटले आहे. यासह राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या यंदा दहा झाली आहे, असं अहवालात म्हटलं आहे.
पुरामुळे राज्यात 7,17, 500 हून अधिक लोक बाधित झाल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. बजली, बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोनगाईगाव, कछार, दरांग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगड, दिमा हसाओ, गोलपारा, हैलाकांडी, होजई, कामरूप, कामरूप मेट्रोपॉलिटन, कार्बी आंगलाँग वेस्ट, करीमगंज, कोकराझार, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबाडी, सोनितपुर आणि उदलगुरी जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.
सकाळ सकाळ CBI दारी, लालू प्रसाद यादवांच्या अडचणीत पुन्हा वाढ
नागावमध्ये सर्वाधिक 3.31 लाख लोक बाधित झाले आहेत. त्यापाठोपाठ कछार (1.6 लाख) आणि होजाली (97,300) यांचा क्रमांक लागतो. बुधवारपर्यंत राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 6.62 लाख लोक बाधित झाले होते. प्राधिकरणाने सांगितलं की, सध्या 1790 गावे पाण्यात बुडाली असून संपूर्ण राज्यात 63,970.62 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं आहे. त्यात असे म्हटले आहे की, अधिकारी 14 जिल्ह्यांमध्ये 359 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवत आहेत. जिथे 80,298 लोकांना आश्रय दिला आहे. यामध्ये 12,855 मुलांचा समावेश आहे.
एका बुलेटिनमध्ये म्हटले आहे की लष्कर, निमलष्करी दल, NDRF, SDRF, नागरी प्रशासन, प्रशिक्षित स्वयंसेवक, अग्निशमन, आपत्कालीन सेवा आणि स्थानिक लोकांनी 7,334 लोकांना विविध पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यासाठी बोटी आणि हेलिकॉप्टरचा वापर केला. अधिकाऱ्यांनी 7,077.56 क्विंटल तांदूळ, डाळी आणि मीठ, 6,020.90 लीटर मोहरीचे तेल, 2,218.28 क्विंटल चारा आणि इतर पूर मदत सामग्रीचे वाटप केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.