अररिया (बिहार), 26 मे : सध्या कोरोना विषाणूचा (Corona in India) संसर्ग वाढत असल्यानं एकमेकांशी शारीरिक अंतर राखणं गरजेचे आहे. मात्र एखाद्याच्या अतिशय अडचणीच्या वेळी योग्य खबरदारी घेऊन मदतीला जाणं गरजेचं आहे. कोरोना काळात लोकांनी माणुसकी सोडल्याची काही उदाहरणं समोर आली आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोनामुळं (Corona Infection) मृत्यू झालेल्या आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी गावातलं कोणीही पुढे आलं नाही. त्यावेळी नाईलाजास्तव त्यांच्या एकट्या मोठ्या मुलीनं पीपीई किट घालून आईचे अंत्यविधी पूर्ण केले. मात्र, लाजीरवाणी बाब म्हणजे श्राद्ध किंवा जेवणाच्या कार्यक्रमावेळी मात्र दीडशेहून अधिक लोकांनी हजेरी लावल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच एकटी मुलगी आपल्या आईचे अंत्यविधी करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांना गावकऱ्यांनी मदत केली ना, कोणी सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्या प्रकारचं सहकार्य केलं. आजही या कुटुंबापर्यंत कसलीही मदत मिळालेली नाही. दफनविधी आणि त्यानंतर प्रथेप्रमाणे केलेल्या एका जेवणाच्या कार्यक्रमासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी आता या मुलांना बरंच कष्ट करावं लागत आहे. कर्जाचं ओझं हलकं करण्यासाठी त्यांना पडेल ते काम करावे लागत आहे. याबाबात जनसत्ता न्यूज पोर्टलने बातमी दिली आहे. ही घटना बिहारमधील वाकया गावातील आहे. या गावातील वीरेन मेहता यांच्या कुटुंबाला कोरोनामुळं बरंच काही गमवावं लागलं. ते स्वतः डॉक्टर म्हणून गावात काम करायचे. रुग्णांची सेवा करता करता त्यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाली. चार दिवसांच्या अंतरात दुर्दैवानं या दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे घरात केवळ त्यांची तीन लहान मुलं राहिली. हे वाचा - 360 प्रवाशांच्या विमानातून एकट्याचा मुंबई-दुबई प्रवास; एका तिकिटाचा खर्च 18 हजार, इंधनाचा खर्च वाचून चाट पडाल! या गावचे सरपंच सरोज कुमार मेहता यांनी सांगितलं की, गेल्या पंधरा दिवसात गावातील दोन डॉक्टरांसह चार लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. त्यांनी सांगितलं की, या दोघांच्या मृत्यूनंतर जेवणाच्या कार्यक्रमावेळी दीडशेहून अधिक लोक आले होते. मी सध्या त्यांच्या कुटुंबाचा हाल-हवाला घेत असतो. त्यांची मोठी मुलगी सोनी लहान भाऊ बहीण नितीश आणि चांदणीची काळजी घेत असते. गावात कोरोनामुळं सध्या खूपच बिकट स्थिती आहे. गावात जेमतेम 200 लोकांनाच कोरोनाची लस मिळाली आहे. कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, सरकार दरबारी सगळ्यांचीच नोंद होत नाही, असे ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.