नवी दिल्ली 13 सप्टेंबर: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शनिवारी रात्री पुन्हा एकदा AIIMमध्ये भरती करण्यात आलं होतं. कोरोनामुक्त झाल्यानंतर ते दुसऱ्यांदा तपासणीसाठी AIIMSमध्ये दाखल झाले आहेत. AIIMSने रविवारी शहा यांच्या प्रकृतीविषयी Health Bulletin जारी केलं त्यात माहिती देण्यात आली आहे. (Amit Shah Health Update) 30 ऑगस्टला अमित शहा यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली होती. मात्र नंतर त्यांना काही दिवसांनी अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे त्यांना AIIMSमध्ये दाखल करण्यात आलं होतं. शऩिवारी त्यांना पुन्हा एकदा श्वास घ्यायला त्रास वाटत असल्याने AIIMSमध्ये दाखल करण्यात आलं होतं. शहा यांना कोरोनामुक्ती नंतरच्या उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये येण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये आल्याचं AIIMSने म्हटलं आहे. काही चाचण्यांसाठी त्यांना 1 ते 2 दिवस हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे. सोमवारपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या चाचण्या करण्यात येत असल्याचंही सांगितलं जात आहे.
शहा यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. नंतर त्यांना 14 ऑगस्टला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांना 18 ऑगस्टला त्यांना थकवा जाणवत होता. त्यानंतर त्यांना 18 ऑगस्टला पुन्हा भरती करण्यात आलं होतं. नंतर 30 ऑगस्टला त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. दरम्यान, भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून विक्रमी वाढ होत आहे. गेल्या 24 तासांतही देशात पुन्हा एकदा 90 हजारहून अधिक रुग्ण सापडले. एकाच दिवसात आज 94 हजार 372 रुग्णांची नोंद झाली. यासह देशातील एकूण रुग्णांची संघ्या आता 47 लाख 54 हजार 356 झाली आहे. तर, 24 तासांत 1114 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात 9 लाख 73 हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 37 लाख 2 हजार 596 रुग्ण निरोगी झाले आहेत. एकूण मृतांचा आकडा 78 हजार 586 झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशाता रिकव्हरी रेट वाढता आहे. सध्या देशात 77.87% रुग्ण निरोगी आहेत. तर, सकारात्मकता दर 8.80% आहे.