वॉशिंग्टन, 18 नोव्हेंबर : अमेरिकेचे माजी सर्जन जनरल विवेक मूर्ती यांच्यासह दोन प्रमुख भारतीय अमेरिकन लोकांना पुढील बायडन-हॅरिस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. मीडियातून ही माहिती देण्यात आली आहे. द वॉशिंग्टन पोस्ट आणि पॉलिटिको यांनी मंगळवारी सांगितले की covid-19 चा सामना करण्यासाठी अध्यक्ष जो बायडन यांच्याकडून वरिष्ठ भारतीय-अमेरिकन सल्लागार मूर्ती यांना आरोग्य आणि मानवी सेवा मंत्री म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक अरुण मजूमदार उर्जामंत्री होऊ शकतात.
विवेक मूर्ती covid-19 सल्लागार मंडळाचे सहअध्यक्ष आहेत. कोरोना विषाणूच्या बाबतीत निर्णय घेण्यात ते बायडन यांचे सहकारी आहेत. त्याचप्रमाणे ते ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी एनर्जीचे पहिले संचालक आणि ऊर्जा संबंधित बायडन यांचे सल्लागार सुद्धा राहिलेले आहेत. तसेच मजूमदार यांच्या व्यतिरिक्त माजी ऊर्जामंत्री अर्नेस्ट मोनीज, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक डॅन रिशर आणि माजी सह ऊर्जामंत्री एलिझाबेथ शेरवूड रॅंडल हे ऊर्जा मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. मूर्तींव्यतिरिक्त उत्तर कॅरोलिनाचे आरोग्य आणि मानवी सेवा मंत्री मॅंडी कोहेन आणि न्यू मेक्सिकोचे गव्हर्नर मिशेल लुझान ग्रीशम हेदेखील आरोग्य आणि मानव सेवा मंत्री पदाचे दावेदार आहेत.
बायडन यांच्या ATR टीममध्ये 20 भारतीय
बायडन यांनी आपल्या एजन्सी रिव्ह्यू टीम, एटीआर टीममध्ये 20 पेक्षा जास्त भारतीयांची निवड केली आहे. त्यातील तीन भारतीय टीमचं नेतृत्व करत आहेत. ही टीम सध्याच्या प्रशासनातल्या प्रमुख फेडरल एजन्सीच्या कामकाजाचा आढावा घेईल जेणेकरून सत्तेचं हस्तांतरण सुरळीतपणे होईल. अमेरिकेत सत्ता हस्तांतरणासाठी तयार केलेल्या टीममध्ये शेकडो सदस्य आहेत त्यापैकी निम्म्याहून अधिक महिला आहेत. त्यामध्ये 40 टक्के असे लोक आहेत जे फेडरल सरकारचे प्रतिनिधित्व करतात. या पथकातील राहुल गुप्ता राष्ट्रीय औषध नियंत्रण धोरणाचे जाणकार आहेत. किरण आहुजा यांनी कर्मचारी व्यवस्थापनासाठी बनवलेल्या टीमचं नेतृत्व केलं आहे. तर पुनीत तलवार यांनी राज्य विभागाशी संलग्न असलेल्या टीममध्ये स्थान मिळवलं आहे. पाव सिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषद व विज्ञान व तंत्रज्ञान टीममध्ये स्थान मिळवले आहे.
त्याचप्रमाणे वाणिज्य व यूएसटीआर या दोन टीममध्ये अरुण व्यंकटरमण यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवीण राघवन आणि आत्मन त्रिवेदी वाणिज्य विभागाच्या टीममध्ये, शिक्षण विभागाच्या टीममध्ये शीतल शहा, ऊर्जा विभागातील टीममध्ये आर. रमेश आणि रामा जाकिर यांचा समावेश आहे. अंतर्गत सुरक्षा विभाग पथकात शुभश्री रामनाथन यांचा समावेश आहे. न्याय विभागासाठीच्या टीममध्ये राज डे, कामगार विभागाच्या टीममध्ये सीमा नंदा आणि राज नायक आहेत. तसंच फेडरल रिझर्व बँक इन सिक्युरिटी नियमन कामकाजासाठी रिना अग्रवाल आणि सत्यम खन्ना, नासासंबंधी टीममध्ये भव्या लाल, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसाठी दिलप्रीत सिद्धू, व्यवस्थापन व बजेटच्या टीममध्ये दिव्य कुमारियाह, कृषी विभागाच्या टीममध्ये कुमार चंद्रन पोस्टल सेवा विभागाच्या टीममध्ये अनीष चोप्रा यांचा समावेश आहे.