कोलकाता, 31 मे : केंद्र आणि पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारमधील संघर्ष थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. विधानसभेच्या निवडणुका होऊन आता बराचा काळ लोटला असला तरी अजूनही धुसपूस काही केल्या कमी झालेली नाही. राज्याचे मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय (West Bengal Chief Secretary Alapan Bandyopadhyay) यांच्या बदलीवरून अजून खडाजंगी सुरू आहे. याविषयावर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banerjee) यांनी मोठी खेळी खेळली आहे. त्यांनी अलपन बंडोपाध्याय यांना आपला मुख्य सल्लागार बनविण्याची घोषणा केली आहे. मंगळवारपासून अलपन बंडोपाध्याय हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम करण्यासा सुरू करणार आहेत. 31 मे पासून अलपन बंडोपाध्याय सेवानिवृत्त होत असले तरी त्यांना मी असंच सोडणार नाही. सेवानिवृत्त झाले असले तरी ते दिल्लीला जाणार नाहीत, ते आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतील, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. त्या पुढं म्हणाल्या की, अलपन मंगळवार 1 जूनपासून मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून कार्यभार स्वीकारतील. अलपन यांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळून लावला केंद्र सरकारने अलपन बंडोपाध्याय यांच्या सेवेमध्ये 3 महिन्यांची मुदतवाढ दिली होती. त्यासाठीचा प्रस्ताव त्यांना पाठवण्यात आला होता. पण, बंडोपाध्याय यांनी सरकारचा हा प्रस्ताव फेटाळून लावत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता ममता यांनी त्यांची मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. अलपन बंडोपाध्याय नेमका वाद काय? अलपन बंडोपाध्याय हे पश्चिम बंगाल राज्याचे मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सेवा आधीच संपली आहे. पण, मध्यंतरी कोरोनाचा काळ आणि राज्यातील परिस्थिती पाहता ममता बॅनर्जींनी त्यांची सेवा तीन महिने वाढवण्याची केंद्र सरकारला विनंती केली आणि ती विनंती मान्यही झाली. त्यानंतर बंडोपाध्याय हे मुख्य सचिवपदी कायम राहिले होते. तर गेल्या काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये ‘यास’ वादळानं हाहाकार माजवला. त्यानं राज्याचं प्रचंड नुकसान झालं. त्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी बंगालच्या दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यावरूनही मोठा वाद झाला होता. ममता बॅनर्जींनी नुकसानीचा अहवाल मोदींना सोपवला आणि त्यांनी बैठकीतून लगेच काढता पाय घेतला. ठाकरे सरकारकडून मराठा समाजाला मोठा दिलासा, EWS आरक्षणाचा मिळणार लाभ! दीदींना ज्या शुभेंदू अधिकारींनी विधानसभेत पराभूत केलं होतं, ते आता बंगालचे विरोधी पक्षनेते आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांनाही बैठकीला आमंत्रित केल्यामुळं ममता नाराज होत्या. त्यामुळं मोदींसोबतची बैठक जवळजवळ त्यांनी टाळलीच. त्यातच बैठकीला मुख्य सचिव अर्धा तास उशिरा पोहोचले. म्हणजे मुख्य सचिवांनी थेट पंतप्रधानांना वाट पहायला लावली. परिणामी केंद्र सरकारनं मुख्य सचिवांना केंद्रात परत येण्याचे आदेश देत बदली केली होती. मात्र, आता त्यांची केंद्रात बदली होऊ द्यायची नाही, यासाठी ममता बॅनर्जींनी नवी चाल खेळली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.