नवी दिल्ली, 20 जानेवारी : एअर इंडिया या हवाई वाहतूक सेवा पुरविणाऱ्या कंपनीतील ‘कॅप्टन’ पदावर असलेल्या कर्मचाऱ्याला पदच्युत करुन ‘Instructor’ बनविण्यात आले आहे. सचिन गुप्ता असं या व्यक्तीचे नाव आहे. कंपनीतील सहकारी महिलेने सचिन गुप्तावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्याने गेल्या वर्षी कंपनीने त्याला निलंबित केले होते. एअर इंडियाच्या अंतर्गत तक्रार समितीने या प्रकरणात तपास केल्यानंतर सचिन हा दोषी आढळून आला आहे. गुन्ह्याची शिक्षा म्हणून कंपनीने त्याला पदच्युत केले आहे. तरी सचिन गुप्ता या शिक्षेविरोधात कंपनीचे अध्यक्ष व संचालकाकडे दाद मागणार आहे. गेल्या वर्षी एक महिला पायलटने सचिनविरोधात लैंगिक अत्याचार व गैरवर्तनुकीची तक्रार दाखल केली होती. तिने केलेल्या तक्रारीनुसार सचिनने तिला अयोग्य पद्धतीचे प्रश्न विचारले होते. गेल्या वर्षी हैदराबाद येथे 5 मे रोजी कंपनीने आयोजित केलेले ट्रेनिंग सेशनला तक्रारदार व सचिन उपस्थित होते. तक्रारदार महिला व सचिन अनेक फ्लाइट्समध्ये एकत्र होते. ट्रेनिंग सेशन झाल्यानंतर दोघेही रात्री एकत्र जेवायला गेले. त्यावेळी सचिनने तक्रारदार महिलेला आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल सांगावयास सुरुवात केली. यावेळी त्याने वैवाहिक जीवनात सुखी नसल्याचे सांगितले. आणि तक्रारदार महिलेला पतीसोबत असलेल्या long distance relation विषयी आणि तिच्या सेक्स लाइफबद्दल विचारले. हे सर्व प्रश्न महिलेसाठी गैरसोईचे होते. त्यामुळे याबद्दल काहीही उत्तर न देता ती तिथून निघून गेली. महिलेसोबत केलेली गैरवर्तणूक कॅप्टनला भोवली असून त्याला Instructor करण्यात आले आहे. सचिन या शिक्षेविरोधात एअर इंडिया कंपनीच्या संचालकांकडे दाद मागणार असून ही शिक्षा कमी करण्याची त्याची मागणी आहे. मात्र अद्याप कंपनीच्या संचालकांनी याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







