28 फेब्रुवारी : भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची अखेर सुटका करण्याची पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घोषणा केली आहे. उद्या वाघा बार्डरवरून त्यांना भारतात सोडण्यात येणार आहे. भारतीय वायू दलाचे अधिकारी जेडी कुरियन यांच्यासोबत अभिनंदन भारतात परतणार आहे.
भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आलेल्या दबावानंतर पाकिस्तान अखेर विंग कमांडर अभिनंदन याची शुक्रवारी सुटका करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत त्यांनी ही घोषणा केली. अभिनंदनच्या सुटकेच्या बदल्यात भारतावर अटी घालण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत होता. मात्र, भारताने पाकिस्तानचे सर्व प्रयत्न धुडकावून लावले होते.
जिनिव्हा करारानुसार अभिनंदनला सोडणं पाकिस्तानला भाग होतं. तर पाकिस्तानचा दबावाचा प्रयत्न होता. भारताने आक्रमक भूमिका घेतल्याने पाकिस्तानला आणखी हल्ल्याची भीती वाटत होती. पाकिस्तानचा हा डाव भारताला माहित होता. त्यामुळे अशी कुठलीही अट भारताने मान्य केली नाही आणि अखेर पाकिस्तानला भारताच्या दबावापुढे झुकावं लागलं.
पाकिस्तानमध्ये असलेले भारतीय वायूदलाचे अधिकारी जेडी कुरियन यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांच्यासोबत वाघा बाॅर्डरवरून अभिनंदन वर्तमान भारतात परतणार आहे. उद्या दुपारपर्यंत ते भारतात येण्याची शक्यता आहे. अभिनंदन यांच्या सुटकेमुळे भारतात जल्लोषाचे वातावरण आहे.
अभिनंदन यांचे 11 व्हिडिओ युट्यूबवर हटवण्याचे निर्देश
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायू दलाचे पायलट अभिनंदन वर्तमान यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. युट्यूबवरही हे व्हिडिओ अपलोड करण्यात आले. त्यामुळे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने युट्यूबला हे व्हिडिओ तत्काळ हटवण्याचे आदेश दिले आहे.
विंग कमांडर अभिनंदन वर्तमान पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्यांचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. काही व्हिडिओमध्ये त्यांना मारहाण कऱण्यात आली आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ते आपली ओळख सांगत असून चहा घेत आहे. परंतु, व्हाॅट्सअॅप, युट्यूबवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
युट्यूबर तब्बल 11 व्हिडिओ काही महाभागांनी अपलोडही केले आहे. त्यामुळे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने हे व्हिडिओ तत्काळ हटवण्याचे आदेश युट्यूब इंडियाला दिले आहे.
===============================