मराठी बातम्या /बातम्या /देश /

एकाच नंबरवरून भारतात आले तब्बल 20 कोटी स्पॅम कॉल्स, Truecaller नं 'या' वर्षाचा रिपोर्ट केला जाहीर

एकाच नंबरवरून भारतात आले तब्बल 20 कोटी स्पॅम कॉल्स, Truecaller नं 'या' वर्षाचा रिपोर्ट केला जाहीर

spam calls

spam calls

ट्रू कॉलरच्या (Truecaller) डेटानुसार, यावर्षी भारतातील मोबाईल युजर्सच्या फोनवर एकाच नंबरवरून तब्बल 20 कोटी स्पॅम कॉल्स करण्यात आले आहेत.

 नवी दिल्ली, 18 डिसेंबर: सध्या घरातील प्रत्येक व्यक्तीकडे स्वत:चा फोन आहे. जवळच्या नातेवाईकांची विचारपूस करण्यापासून ते थेट मुलांच्या ऑनलाईन शाळेसाठी फोनचा वापर होतो. आपल्या फोनवर दिवसभरात अनेक कॉल्स येतात. त्यातील काही आपल्या ओळखीचे असतात, काही टेली मार्केटिंगचे (Telemarketing) असतात. कधी-कधी दिवसभरात दोन-तीनवेळा स्पॅम कॉल्स (Spam calls) येतात की आपण वैतागून जातो. या स्पॅम कॉल्सच्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक (Fraud) झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. ट्रू कॉलर (Truecaller) या मोबाईल अॅपनं (Mobile App) स्पॅम कॉल्सच्या संबंधित एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. माहितीतील आकडेवारी पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ट्रू कॉलरच्या डेटानुसार, यावर्षी भारतातील मोबाईल युजर्सच्या फोनवर एकाच नंबरवरून तब्बल 20 कोटी स्पॅम कॉल्स करण्यात आले आहेत. आजतकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

ट्रू कॉलर हे खूप लोकप्रिय अॅप आहे. तुमच्या फोनवर येणाऱ्या प्रत्येक कॉलचं लोकेशन (Location), कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि इतर डेटा जमा करून त्याचे रेकॉर्ड मेंटेन ठेवण्याचं काम हे अॅप करतं. नुकतंच ट्रू कॉलरनं या वर्षाचा ग्लोबल स्पॅम रिपोर्ट (Global Spam Report) जाहीर केला आहे. या रिपोर्टमध्ये 2021मधील जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंतची आकडेवारी देण्यात आली आहे. यातून विविध प्रकारची रंजक आकडेवारी समोर आली आहेत. ट्रू कॉलरच्या मते, एका स्पॅमरनं या वर्षात भारतामध्ये तब्बव 202 दशलक्ष (20 कोटी) स्पॅम कॉल केले आहेत. याचा अर्थ दररोज एकाच फोन नंबरवरून सुमारे 6 लाख 64 हजार लोकांना फोन केले जात होते. प्रत्येक तासाचा विचार केल्यास या स्पॅमरनं दर तासाला 27 हजार लोकांना स्पॅम कॉल करून त्रास दिला आहे.

आपल्या रिपोर्टमध्ये ट्रू कॉलरनं म्हटलं आहे की, कंपनी वेगवेगळ्या ठिकाणांवरील टॉप स्पॅमर्सची यादी अॅक्टिव्हली मेंटेन करण्याचं काम करते. यामाध्यमातून कंपनी एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील स्पॅमर्सना (Spamers) ब्लॉक करते. भारतामध्ये दर महिन्याला प्रत्येक युजरला 16 पेक्षा जास्त स्पॅम कॉल येतात. जर एकूण स्पॅम कॉल्सचा विचार केला तर, ट्रू कॉलर युजर्सला सुमारे 3.8 अब्ज स्पॅम कॉल आले आहेत. विशेष म्हणजे रिपोर्टमधील डेटा हा फक्त ऑक्टोबर महिन्यापर्यंतचाच आहे. याच लिस्टमध्ये 20 कोटी स्पॅम कॉल करणारा स्पॅमर निदर्शनास आला आहे.

या वर्षी भारतातील स्पॅम कॉल्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ट्रू कॉलरच्या टॉप-20 मोस्ट स्पॅम्ड कंट्रीजच्या (Spammed countries) यादीमध्ये भारत चौथा स्थानावर आला आहे. गेल्या वर्षी याच यादीमध्ये नवव्या स्थानावर होता. युजर्सला येणाऱ्या स्पॅम कॉल्समध्ये सर्वात जास्त कॉल टेलीमार्केटिंगचे आणि फायनान्शियल सर्व्हिसेसचे असतात, असं कंपनीच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

स्पॅम कॉलच्या माध्यमातून स्कॅम केले जातात. केवायसी (KYC) आणि ओटीपीचा (OTP) वापर करून सर्वात जास्त स्कॅम केला जातो. स्कॅम करणारे युजर्सला विविध सुविधा देण्याचं आणि केवायसी करण्याचं आमिष दाखवून त्यांचे बँक डिटेल्स आणि ओटीपी विचारतात. डिटेल्स आणि ओटीपी मिळाल्यानंतर सहज फसवणूक करता येते, असं देखील ट्रू कॉलरच्या रिपोर्टमध्ये उघड झालं आहे.

जागतिक स्तरावर विचार केल्यास सर्वात जास्त स्पॅम कॉल ब्राझीलमधील युजर्सला येतात. ब्राझीलमध्ये दरमहिन्याला प्रत्येक युजरला जवळपास 33 स्पॅम कॉल येतात. दुसऱ्या क्रमांकावर पेरू (Peru) या दक्षिण अमेरिकन खंडातील देशाचा क्रमांक लागतो. याठिकाणी प्रत्येक युजरला महिन्याकाठी 18 स्पॅम कॉल येतात.

गेल्या काही वर्षांमध्ये स्पॅम कॉल्सचा वापर करून फसवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं अशा कॉलवर जर काही कॉन्फिडेन्शियल माहिती विचारण्यात आली तर ती देवू नये. ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी माहिती न देणं, हा सर्वात उत्तम पर्याय आहे.

First published:

Tags: Smartphones, Truecaller