Home /News /national /

मंत्रिमंडळ विस्ताराची Inside Story: 11 बड्या मंत्र्यांचे राजीनामे मागणारा 'तो' एक कॉल कुणी केला

मंत्रिमंडळ विस्ताराची Inside Story: 11 बड्या मंत्र्यांचे राजीनामे मागणारा 'तो' एक कॉल कुणी केला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी पार पडला. यामध्ये नव्या चेहऱ्यांची जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा जुन्या चेहऱ्यांच्या राजीनाम्याची झाली.

    नवी दिल्ली, 8 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Expansion) बुधवारी पार पडला. यामध्ये नव्या चेहऱ्यांची जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा जुन्या चेहऱ्यांच्या राजीनाम्याची (Resignation) झाली. एरवी हाऊसिंग सोसायटीतील एखादं पद सोडायचं तरी किती हलकल्लोळ, तमाशा आणि रुसवे-फुगवे होतात, हे आपण पाहतोच. मग साक्षात केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा या 11 मंत्र्यांनी कसा काय एवढ्या सहजासहजी दिला असेल, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. केंद्र सरकारमधील रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, रमेश पोखरियाल, डॉ. हर्ष वर्धन यासारखे दिग्गज मंत्री एकाएकी पद सोडायला तयार झाले आणि कुठळाही खडखडाट न होता जुने डबे रुळावरून उतरावेत आणि नवे डबे चढून रेल्वेचा प्रवास सुरळीत सुरू व्हावा, अशा सहजतेनं हा खांदेपालट झाला. यातील काहीजण तर मोदी सरकारच्या पहिल्या काळातही मंत्री होते. मात्र या सर्वांना एक फोन आला आणि काहीही आदळआपट न करता त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. कुणाचा होता हा फोन? हा फोन साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होता, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर जरा थांबा. तुमचा अंदाज चुकतो आहे. स्वतः पंतप्रधानांनी हे फोन केलेच नाहीत. मंत्रीमंडळात कुणाचा समावेश करायचा आणि कुणाला डच्चू द्यायचा, याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला असला, तरी 11 जणांना त्यांच्यासाठीची बॅड न्यूज देणारा फोन स्वतः पंतप्रधानांनी केलाच नव्हता. आता काहीजणांना वाटेल की हा फोन गृहमंत्री अमित शाहांनी केला असेल. मात्र हा अंदाजही साफ चुकीचा आहे. अमित शाहा हे केंद्र सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री असले तरी मंत्रीमंडळाबाबतचे निर्णय हे स्वतः मोदीच घेत असल्याचं यापूर्वीदेखील सिद्ध झालं आहे. पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळातदेखील मंत्रीमंडळ विस्ताराच्या वेळी अमित शाहांच्या निर्णयप्रक्रियेतील सहभागाबाबत चर्चा झाली होती. मात्र मोदींनीच अंतिम नावं निश्चित केल्याचं समोर आलं होतं. तर हा फोन होता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या मंत्र्यांची नावं निश्चित केली आणि कुठल्या विद्यमान मंत्र्यांना नारळ द्यायचा, या यादीवर शिक्कामोर्तब केलं, तेव्हा ती यादी पोहोचली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हाती. मग नड्डा फोन घेऊन एका जागी बसले आणि लागोपाठ 11 फोन लावत सर्वात अवघड असणारं काम पूर्ण केलं. नो नाटक, नो तमाशा तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि खुर्ची रिकामी करा, असा फोनवरून आलेला आदेश शिरसावंद्य मानत सर्वच्या सर्व 11 मंत्र्यांनी आपले राजीनामे राष्ट्रपतींकडे सुपूर्द केले आणि राष्ट्रपतींनीदेखील ते तत्काळ मंजूर केले. केवळ राजीनामे देऊन हे मंत्री थांबले नाहीत, तर त्यांनी लगोलग आपल्या ट्विटर खात्यावर जाऊन आपलं पदही अपडेट केलं. रविशंकर प्रसादांनी आपण बिहारच्या पटना साहिब लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजप कार्यकर्ता असल्याची ओळख अपडेट केली, तर प्रकाश जावडेकरांनीही आपल्या मंत्रिपदाचा उल्लेख काढून टाकत भाजप खासदार अशी ओळख सांगत ट्विटरवरचा स्वतःचा ‘इन्ट्रो’ बदलला. या सगळ्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. काहींना हे मंत्रिमंडळातील आणि पक्षातील शिस्तीचं धोरण वाटत होतं, तर काहीजणांच्या मते याला विरोध करून काहीच उपयोग होणार नसल्याची जाणीव असल्यामुळेच मंत्र्यांनी हा ‘समजूतदारपणा’ दाखवल्याची चर्चा होती.
    Published by:desk news
    First published:

    Tags: BJP, Narendra modi, Union cabinet

    पुढील बातम्या