उत्तराखंड, 7 फेब्रुवारी : उत्तराखंडमधील चमेली जिल्ह्यातील जोशीमठ तालुक्यात आज मोठा हिमकडा कोसळल्याच्या बातमीने देशाला मोठा धक्का बसला. हिमकडा कोसळल्यामुळे नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. या दुर्घटनेत अनेक लोकं बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे. याची आलेले सर्व व्हिडिओ भीतीदायक होते. अशातच एक सकारात्मक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये UTBP चे जवान खड्ड्यातून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम करीत आहे. एक व्यक्ती बाहेर निघाल्यानंतर त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय बाहेर आलेला व्यक्तीदेखील अत्यंत आनंदात दिसत आहे. अशा प्रकारे जीवाची पर्वा न करता हे जवान लोकांचा शोध घेत आहेत.
उत्तराखंडमधील महाभयंकर दृश्यांनंतर एक आशादायी व्हिडिओ pic.twitter.com/deggGsaCTJ
— News18Lokmat (@News18lokmat) February 7, 2021
जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात आज सकाळी ही घटना घडली आहे. हिमकडा कोसळून धौली गंगा नदीत कोसळला आहे. त्यामुळे नदीला महापूर आला आहे. हिमकडा कोसळल्यामुळे धरणाच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नदीला महापूर आला असून गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरांखडमध्ये SDRF टीम नदी शेजारी राहणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करीत आहे. काही गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अजूनही काही ठिकाणी लोकं अडकलेली आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. धौलीगंगा नदीला महापूर आला असून नंदप्रयाग, कर्णप्रयाग, देवप्रयाग, रुद्रप्रयाग या परिसरातील हॉटेल, लॉज आणि घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे.