कडाक्याच्या थंडीने आणखी एका तरुण आंदोलनकर्त्याचा मृत्यू, शेतकरी मात्र मागे हटेनात

कडाक्याच्या थंडीने आणखी एका तरुण आंदोलनकर्त्याचा मृत्यू, शेतकरी मात्र मागे हटेनात

शेतकरी आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र मागे न हटण्याचा निर्धार केलेल्या आंदोलनकर्त्यांपैकी अनेकांनी आपले जीवही गमावलेत.

  • Share this:

चंदीगढ, 17 डिसेंबर : शेतकरी आंदोलन सध्या ऐन भरात आहे. अशातच अनेक शेतकऱ्यांचे कडाक्याच्या थंडीसह अनेक कारणांनी जीव जात असल्याच्या घटनाही समोर येत आहेत.

अशीच एक घटना गुरुवारी सकाळी घडली. टिकरी बॉर्डर इथं जमलेल्या आंदोलकांपैकी एक असलेला 38 वर्षीय शेतकरी आंदोलनस्थळाजवळ मृत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. जय सिंग असं त्याचं नाव होते. हरियाणा इथले धर्मगुरू बाबा राम सिंग यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकारचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आजच गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. आता दुसऱ्याच दिवशी आणखी एका शेतकऱ्याचा जीव गेला आहे.

जय सिंग हे भटिंडा इथल्या तुंगवली खेड्यातील रहिवासी होते. ते आणि त्यांचा भाऊ केंद्र सरकारने आणलेल्या तीन शेतकरी कायद्यांविरूद्ध सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यास आले होते. 'भारतीय किसान युनियन' (एकता उग्राहन) च्या शिंगारा सिंग यांनी ही माहिती दिली. जय सिंग सकाळी मृत आढळले. शवविच्छेदन झाल्यावरच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येऊ शकेल असं हरियाणाच्या बहादुरगड इथल्या पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं. सिंग यांच्या भावाच्या म्हणण्यानुसार, जय यांचा मृत्यू ह्रद्यविकाराच्या झटक्यानं झालेला असू शकतो. जयची बॉडी  बहादूरगढ सिवील हॉस्पीटलला पाठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.

शिंगारा सिंग यांनी 10 लाख रुपये नुकसानभरपाई आणि मृताच्या नातलगासाठी सरकारी नोकरी मागितली आहे. आंदोलनादरम्यान नैसर्गिक कारणांशिवाय रस्ते अपघातात आजतागायत जवळपास 20 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे बीकेयू एकता संघाच्या नेत्यानं सांगितलं.

मागील तीन आठवड्यांपासून तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत शेतकरी दिल्लीच्या विविध बॉर्डर पॉइन्ट्सवर बसले आहेत. या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नाही तर कॉर्पोरेट्सना फायदा होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

Published by: News18 Desk
First published: December 17, 2020, 5:56 PM IST

ताज्या बातम्या