मुंबई, 27 एप्रिल : देशभरात कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. देशात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी आज देशातील मृत्यूंचा आकडा हा वाढला आहे. गेल्या 24 तासात 1,463 नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्यानंतर आता देशातील रुग्णांची संख्या 28,380 इतकी झाली आहे.
आज देशातील मृत्यूंचा आकडा हा सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. 24 तासांत 60 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 28,380 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय देशातील बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 6,362 इतका आहे. याशिवाय देशात आतापर्यंत मृतांचा आकडा 886 इतका झाला आहे.
पुणे विभागात कोरोनाबाधित 1457 रुग्ण
पुणे विभागातील 230 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1457 झाली आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात 1319 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 48 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात 1319 बाधीत रुग्ण असून 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 33 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 65 बाधीत रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 29 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 11 बाधीत रुग्ण आहेत.
मालेगावात गुडन्यूज
कोरोना व्हायरसमुळे हादरलेल्या नाशिककरांसाठी आजचा सोमवार गुड न्यूज घेऊन आला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात 440 पैकी 439 संशयित रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. आनंदाची बाब म्हणजे आधीच्या 4 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
एकूण रुग्णसंख्या - 28,380
एकूण मृतांची संख्या - 886
संबंधित -CM उद्धव ठाकरे यांच्यासाठी मंत्रिमंडळाने घेतला हा मोठा निर्णय, पेच सुटणार?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.