अनूप पासवान, प्रतिनिधी कोरबा, 28 जुलै : सध्या अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटना समोर येत असतात. छत्तीसगडमधील कोरबा याठिकाणीसुद्धा सर्पदंशाच्या घटना वाढल्या आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला मध्यरात्रीच्या सुमारास साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला. सर्पदंशानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तरीसुद्धा त्याचा जीव वाचू शकला नाही आणि सर्पदंशामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले. प्रतापसिंग कंवर असे या मृताचे नाव आहे. रात्रीच्या अंधारात त्याने बेडखाली पाय ठेवला आणि याठिकाणी असलेल्या विषारी सापाने चावा प्रतापसिंगला चावा घेतला, असे सांगितले जात आहे. सर्पदंशाची ही घटना कोरबा जिल्ह्यातील हरदीबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोईदा गावातील आहे.
मृत व्यक्तीचे वय 49 वर्ष होते, असे सांगितले जात आहे. प्रताप सिंह कंवर त्यांच्या घरात झोपले होते. यावेळी रात्री तीन वाजेच्या सुमारास ते बेडवरून खाली उतरले. मात्र, याचवेळी त्यांना सापाने चावा घेतला. यानंतर प्रताप सिंह यांना सर्पदंश झाल्याची माहिती मिळताच घरात एकच खळबळ उडाली. त्यांना तत्काळ त्यांच्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी हरदीबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी रात्रीच्या वेळी कुठे जाताना टॉर्चचा वापर करावा. तसेच जमिनीवर झोपू नये. तसेच जेव्हाही जमिनीवर झोपाल तर मच्छरदानीचा वापर नक्की करा. आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा. तसेच वेळोवेळी आपल्या घरात कीटनाशकची फवारणी करत राहा, असे आवाहनही त्यांनी केले.