नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : श्रीकाकुलम - आंध्र प्रदेशमध्ये माकडांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यातील कविता मंडलातील सिलागाम गावाजवळील जंगलात एक-दोन नव्हे तर तब्बल 40 माकडांचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या माकडांना विष देऊन मारल्याचा संशय स्थानिक लोकांनी व्यक्त केला आहे. कासीबुगा वन अधिकारी मुरली कृष्णा यांनी सांगितलं, की या माकडांचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं आहे, त्याचा अहवाल पाच दिवसांत येईल. अॅनिमल अॅक्टअन्वये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, लवकरच गुन्हेगार पकडले जातील, असं पोलिसांनी सांगितलं. या संदर्भात एशियानेट हिंदीने वृत्त दिलंय.
माकडांना विष दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कासीबुगाचे फॉरेस्ट ऑफिसर मुरली कृष्णन यांनी माकडांचे मृतदेह सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. ते म्हणाले, की जिल्ह्यात अशी घटना या पूर्वी कधीही घडल्याचं आम्ही ऐकलं नव्हतं. कोणीतरी ट्रॅक्टरमधून माकडं आणून गावातील जंगल परिसरात सोडून दिल्याचं बोललं जात आहे. या ठिकाणी जवळपास 40 ते 45 माकडं मृतावस्थेत आढळून आली आहेत.
या पूर्वीही दक्षिणेतील राज्यांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये माकडांच्या सामूहिक हत्या झाल्याची घटना घडली होती.
हेही वाचा - मुंबईतील व्यावसायिकानं केदारनाथधामला दान केलं 230 किलो सोनं, मंदिराच्या भिंती सोन्याने मढवल्या
कर्नाटकमध्ये आढळले होते माकडांचे मृतदेह
जुलै 2021 मध्ये कर्नाटकमध्ये अशीच एक घटना घडली होती. इथे बोनेट मॅकाक प्रजातीच्या माकडांना अज्ञात लोकांनी विष देऊन ठार मारलं होतं. बोनेट मॅकाक ही माकडांची दक्षिण भारतातील स्थानिक प्रजाती आहे. या 38 हून अधिक माकडांचे मृतदेह आढळून आले होते. माकडांना विष देण्याबरोबरच अज्ञात व्यक्तींनी त्यांना पोत्यात भरून मारहाण केली होती. या माकडांच्या शरीरावर मारहाणीमुळे गंभीर जखमा झाल्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. हासन जिल्ह्यातील बेलूर तालुक्यातील अरेहली होबळी येथील चौडेनहल्ली येथील रस्त्याच्या जंक्शनवर हे मृतदेह सापडले होते. चौडेनहल्ली येथील ग्रामपंचायत सदस्य तेजस यांना पोत्याजवळ माकड बसलेलं दिसल्याने ही घटना उघडकीस आली होती.
तमिळनाडूमध्ये आढळली होती मृत माकडं
23 जानेवारी 2022 रोजी तमिळनाडूमधील तिरुचीपासून काही किलोमीटर अंतरावर नेदुंगूर येथे तिरुची-चेन्नई राष्ट्रीय महामार्गाजवळील मोकळ्या जागेत 24 माकडं मृतावस्थेत आढळली होती. सकाळी स्थानिक लोकांनी मृत माकडं पाहिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. त्या 24 माकडांपैकी 18 नर आणि सहा माद्या होत्या. ही माकडं अन्य कुठल्यातरी ठिकाणी किंवा जिल्ह्यात पकडून त्यांचे मृतदेह महामार्गालगत फेकण्यात आले असावेत, अशी शक्यता त्यावेळी वन अधिकाऱ्यांनी वर्तवली होती. माकडांच्या अनैसर्गिक मृत्युची चौकशी करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आलं होतं, असं तिरुची सर्कलचे तत्कालीन मुख्य वनसंरक्षक एन. सतीश यांनी सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monkey, Top trending, Viral