श्रीनगर, 18 जानेवारी : काश्मिरच्या खोऱ्यात वास्तव्यास असलेले काश्मिरी पंडित 19 जानेवारी हा ‘काळा दिवस’ मानतात. याच दिवशी 1990 साली काश्मिर खोऱ्यातील वातावरण अत्यंत बिघडले होते. तेव्हा परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, हजारो काश्मिरी पंडितांनी आपल्याच घरातून पलायन केले. मे 1990 पर्यंत तब्बल पाच लाख काश्मिरी पंडित जीव वाचवण्यासाठी आपली मातृभूमी सोडून काश्मिरच्या बाहेर निघून गेले होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतरचे हे सर्वात मोठे पलायन मानले जाते. त्यामुळे दरवर्षी 19 जानेवारी रोजी हा दिवस काश्मिरी पंडित काळा दिवस मानतात. या घटनेला उद्या रविवारी 30 वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज ट्विटरवर काश्मिरी पंडितांचे संदेश ट्रेंड होत आहे. देशातील विविध भागांमध्ये राहणारे काश्मिरी पंडित ‘हम वापस आएंगे’ हा संदेश देत आहे. त्यामुळे देशातील विविध भागांमधून काश्मिरी पंडितांनी केलेले हे ट्विट ट्रेंड होत आहे. काश्मिरी पंडितांचे मनोगत… ते 1990चे साल होते. त्या दिवशी चांगली थंडी पडली होती. संजय तिकू हे दूरदर्शनवर एक चित्रपट पाहत होते. त्याचवेळी अचानक घराबाहेर, रस्त्यांवर लाउड स्पीकरचा आवाज ऐकू लागला. मी तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे संजय तिकू यांनी सांगितले. मशिदीमधून काश्मिरी पंडितांनी खोरं सोडून जाण्यास सांगितले जात होते. खोऱ्यामध्ये ‘ए जालिमों ए काफिरो कश्मीर हमारा छोड दो’ च्या घोषणा दिल्या जात होत्या. त्यानंतर मात्र काश्मिरी पंडित पुरते घाबरल्याचे तिकू सांगतात. शेवटी अनेक काश्मिरी पंडित काश्मिरचे खोरं सोडून निघून गेले. हळूहळू हे वातावरण इतकं बिघडलं की शेवटी सीआरपीएफच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. यानिमित्ताने आज पुन्हा हा इतिहास आठवला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.