मुंबई, 21 जून : आज 21 जून योगा दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत लस मिळणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली होती. त्यानुसार देशातील अनेक ठिकाणी 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान महाराष्ट्रात केव्हापासून लसीकरण सुरू होणार, याबाबत सवाल उपस्थित केला जात होता. अखेर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यावर उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात 22 जून (मंगळवार) पासून 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरू होणार आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, कालपर्यंत महाराष्ट्रात 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींच लसीकरण करत होतो. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे आणि त्यामुळे 18 वर्षांपुढील सर्व वयोगटातील वर्गाला आपण लसीकरणाला मान्यता देत आहोत. त्यामुळे महाराष्ट्राच्या तरुणाईला यानिमित्ताने मला सांगावसं वाटतं की आपण आपापल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन अठरा वर्षाच्या पुढील युवक-युवती पासून पुढील सर्व वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करणं शक्य आहे. लसीकरणाचा वेग सुरळीत होत नसल्याने सरकारी केंद्रांमध्ये आजपासून लसीकरण सुरू करण्यात आलं नव्हतं, असं सांगितलं जात आहे. हे ही वाचा- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्या, मृतांच्या आकड्यात लक्षणीय घट यापुढे आरोग्य मंत्री म्हणाले की, तिसरी लाटेसंबंधात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. यामध्ये ग्रामीण रूग्ण व्यवस्थेवर भर दिला जाणार आहे. याशिवाय पुढील काळात लहान मुलं आणि नवीन कोरोना व्हायरस रूपांतर यावर अधिक लक्ष दिलं जाणार आहे. नवीन मोफत लसीकरण धोरण काय आहे ते जाणून घ्या नवीन लसीकरण मोहिमेत 18 ते 44 वयोगटातील नागरिक थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेऊ शकतात. यापूर्वी ही लस घेण्यासाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना CoWIN पोर्टलद्वारे अपॉईंटमेंट घेणे आवश्यक होते. मात्र या मोहिमेनुसार, 18 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोफत लस दिली जाईल. या मोठ्या लसीकरण मोहिमेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलेल आणि राज्यांना काही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. दरम्यान खासगी रुग्णालयात लस मिळण्यासाठी किंमत मोजावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







