मुंबई, 6 जुलै : राजधानी मुंबईत सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. धारावी, वरळी यांसारख्या हॉटस्पॉटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात प्रशासनाला यश आलं. मात्र त्यानंतर अंधेरी आणि इतर भागांमध्ये कोरोनाला फैलाव झाला असून कोरोनाला रोखायचं कसं? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेने कोरोना नियमंत्रणाबाबत एक दावा केला आहे. आयसीएमआरच्या सूचनेनंतर कोरोना व्हायरसचा सामुदायिक संसर्ग पडताळण्यासाठी महापालिकेने शहराच्या विविध भागांमध्ये सेरो सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे कोरोनाचा सामुदायिक संसर्ग होऊ नये, यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना ठरवण्यात मदत होणार आहे. याआधारे मुंबईतील कोरोना संसर्ग जुलैच्या मध्यापर्यंत पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकेल, असा दावा महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिलं आहे. दरम्यान, मुंबईत रविवारी 69 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर कोरोनाचे नवे 1287 रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 84 हजार 524 इतकी झाली आहे. यामध्ये 23 हजार 732 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. भारतातील स्थिती आणखी गंभीर देशात गेल्या 24 तासांत 24 हजार 248 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 425 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 7 लाखांच्या घरात गेला आहे. सध्या देशात 6 लाख 97 हजार 413 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 2 लाख 53 हजार 287 सक्रीय रुग्ण आहेत. तर 4 लाख 24 हजार 433 रुग्म निरोगी झाले आहेत. तर, एकूण मृतांची संख्या 19 हजार 693 झाली आहे. संपादन, संकलन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.