मुंबई, 23 जानेवारी : राज्यात या वर्षाच्या सुरूवातीपासून थंडी पडल्याने महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोर वाढला. दरम्यान, आता तापमानातील घटीमुळे मुंबईच्या हवेतील गारठा आठवडावर कायम राहणार, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीची अनुभूती आणखी काही दिवस घेता येईल. मुंबईतील हवेची गुणवत्ताही आणखी दोन दिवस खालावलेलीच असेल.
किमान तापमानात घट झाल्याने हवेत दिवसभर गारवा होता. तसेच सकाळचे वातावरणही धुरक्याने वेढले होते, त्यामुळे काल रविवारीही मुंबईत थंडी होती. दरम्यान, सांताक्रूझ येथे 17 अंश सेल्सिअस तर कुलाब्यात 19.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. येत्या शनिवापर्यंत किमान तापमान 17 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दरम्यान, काही ठिकाणी कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावर देखील परिणाम होत असून, थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटविल्या जात आहेत, तसेच सकाळपासूनच शहराच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
मुंबईची हवा खराबच..
वाऱ्यांचा वेग मंदावला होता. त्यामुळे रविवारी हवेची गुणवत्ता ‘वाईट’ या श्रेणीत होती. पुढील दोन दिवस हवेचा दर्जा आणखी खालावेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवेतील प्रदुषणाची नोंद घेणाऱ्या ‘सफर’ या संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Rise in temperatures