उल्हासनगर, 22 जुलै : धोबीघाट टेकडीवरील माती खचल्याने दोन घरं कोसळल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास इथल्या टेकडीवरील माती खचायला सुरुवात झाली होती. मात्र सायंकाळी आठच्या सुमारास टेकडीवरील माती मोठ्या प्रमाणात खचल्याने दोन घरं या मातीच्या ढिगाऱ्यासह खाली आली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे.
उल्हासनगर कॅम्प 1 मधील धोबीघाट परिसरात कमला नेहरू नगर आहे. या नगरमध्ये असलेल्या बाळ शिवाजी उद्यानावर टेकडीचा उभा सुळका आहे. ही टेकडी कोसळू नये, यासाठी तत्कालीन आमदार पप्पू कलानी यांनी सरंक्षण भिंत बांधली होती. ही भिंत २०१५ च्या दरम्यान कोसळल्यानंतर टेकडीवरील शिवनेरी नगरचा परिसर हा धोकादायक झाला होता. त्यानंतर दरवर्षीच्या पावसात ह्या टेकडीची माती खचून मोठ्या अनेक दुर्घटना घडत होत्या.
दोन दिवसांच्या पावसामध्ये या टेकडीची माती घसरत होती. त्यामुळे दुर्घटना होण्याच्या आधी इथल्या घरांच्या भिंतींना तडे गेले होते. त्यामुळे ही घर कोसळतील याची जाणीव शिवनेरी नगर मधील रहिवाश्याना झाल्याने त्यांनी काही तास आधीच ही घर खाली केली होती. त्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र वित्त आणि मोठ्या प्रमाणात झालीय. तसेच ह्या टेकडीवर असलेल्या स्वामी विवेकानंद शाळेच्या शौचालय आणि सरंक्षक भिंतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
सध्या या टेकडीवरील अनेक घरांच्या खालीची माती खचण्याच्या स्थितीत असून ते कधीही कोसळतील अश्या स्थितीत आहेत. दुर्घटनेनंतर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी आता या घरांना नोटीस बजावल्या असून घर खाली करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र या मुसळधार कोसळणाऱ्या या पावसात जीवमुठीत घेऊन रात्रभर जागून इथे नागरिक राहत आहेत.
पावसाळा सुरू झाला की दरवर्षी महापालिका प्रशासकडून नोटीस देत घरं खाली करण्याच्या सूचना केल्या जातात. मात्र कोणी या समस्येवर तोडगा कायम स्वरूपी तोडगा काढत नाहीत. निवडणुकीच्या वेळी मतदान मागतांना अनेक आश्वासने दिली, मात्र त्यांनी देखील आतापर्यंत तोंडाला पानं पुसली. लॉकडाऊन मध्ये आमची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे. त्यामुळे कुठे भाड्याने घर घेण्याची देखील आमची ऐपत नाही म्हणून पर्याय नसल्याने अश्या स्थितीत जीव मुठीत घेऊन राहावे लागत असल्याची भावना सुमित्रा पाटील यांनी व्यक्त केली आहे. या टेकडीवर मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. वारंवार होत असलेल्या दुर्घटना पाहता इथे संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे. त्यासाठी पालिकेला पाठपुरावा केलाय, मात्र लक्ष दिले जात नाही असे मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ulhasnagar, Ulhasnagar news