• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मुंबईतील रुग्णालयात रुग्णांचं आयुष्य धोक्यात, रात्री उशिरा नेमकं काय घडलं?

मुंबईतील रुग्णालयात रुग्णांचं आयुष्य धोक्यात, रात्री उशिरा नेमकं काय घडलं?

हेंटिलेटरवर आणि आयसीयूमध्ये असलेल्या अनेक रुग्णांना (Corona Patients) पालिकेच्या इतर रुग्णालयात हलवण्यात आलं.

  • Share this:
मुंबई, 17 एप्रिल : देशातील सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) रुग्णालयातील सेवा ऑक्सिजन अभावी बाधीत होत असल्याचं चित्र शुक्रवारी बघायला मिळालं. पश्चिम उपनगरातील भगवती रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा शुक्रवारी झालाच नाही. त्यामुळे व्हेंटिलेटरवर आणि आयसीयूमध्ये असलेल्या अनेक रुग्णांना (Corona Patients) पालिकेच्या इतर रुग्णालयात हलवण्यात आलं. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे आणि मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रुग्णालय बाधित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबई महापालिकेच्या मालकीच्या रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला, तर त्यांच्या जीवावर बेतू नये म्हणून हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना शुक्रवारीच इतर रुग्णालयात हलवलं. त्या पैकी आयसीयूमध्ये असलेल्या 6 जणांना कांदरपाडा जम्बो कोविड केअर सेंटर, 11 जणांना शताब्दी रुग्णालय तर 23 जणांना दहिसर जंबो कोविड सेंटर आणि 2 जणांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. भगवती रुग्णालयात अजूनही 49 करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज जर ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने ऑक्सिजनचे सिलेंडर पुरवले नाहीत तर याही रुग्णांना इतर ठिकाणी हलवलं जाण्याची शक्यता आहे. खरंतर शुक्रवारी दुपारी 15 जणांना आधी हलवण्यात आलं होतं. पण रात्री जेव्हा आणखी ऑक्सिजन सिलेंडरचा बंदोबस्त झाला नाही तेव्हा मात्र आणखी 27 रुग्ण भगवती रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले आणि आता तर या रुग्णालयात कोविड रुग्णांना दाखल करून घेतलं जात नाही. हेही वाचा - जगाला Corona Vaccine चा पुरवठा करणाऱ्या भारतावर का आली लस आयात करण्याची वेळ? वाचा कारण 'आमच्याकडे ऑक्सिजनचा पुरवठा आज सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. कंत्राटदाराला तसं सांगण्यात आलेले आहे,' असं या रुग्णालयाचे डॉ. शांताराम कवाडे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'कंत्राटदाराने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला नाही, पण रुग्णांच्या जीवावर बेतू नये म्हणून आम्ही रुग्णांना दुसरीकडे हलवलं आहे. जर पुरवठा सुरळीत झाला नाही आणि गरज पडली तर आम्ही इतर सगळ्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात नेऊ, जेणेकरून कुणालाही त्रास होणार नाही,' असं सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, भगवती रुग्णालयातून रुग्णांना इतर कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यासाठी मदत करणाऱ्या स्थानिक आमदार मनिषा चौधरी यांनी या कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे. 'पालिका अत्यंत निष्काळजी आहे. महानगरपालिकेकडे पुरवठा सुरळीत होतो की नाही, हे बघेल असा साधा इंजिनियर नाही. हेही काम डॉक्टरांनाच करावे लागते. जर शनिवारी पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही इथे उपोषणाला बसू ,' असा थेट इशारा आमदार मनिषा चौधरी यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिला आहे.
Published by:Akshay Shitole
First published: