मुंबई, 13 फेब्रुवारी : मुंबई पोलीस आपल्या कडक शिस्तीसाठी जगभर ओळखली जाते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या अतिशय महत्त्वाच्या शहराची जबाबदारी पोलिसांची एक वेगळी बाजू समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला असून त्याला एक हृदयस्पर्शी पुनर्मिलन! असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेशमधील एका वृद्ध महिलेची ही गोष्ट आहे. काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशहून आलेलं एक कुटुंब ब्रांद्रा टर्मिनसवर उतरलं. नेहमीप्रमाणे ब्रांदा रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी होती. याच गर्दीत एक 65 वर्षांची आजी आपल्या कुटुंबासोबत उतरली. मात्र, गर्दीत अचानक कुटुंबापासून तिची चुकामूक झाली. कुटुंब दिसेनासे झाल्यानंतर आजी घाबरली. इतक्या मोठ्या शहरात आपण चुकल्याची जाणीव झाल्याने तिला रडू कोसळलं. आता आपण कधीच घरी जाणार नाही, अशीच तिची खात्री झाली असावी. दरम्यान, तिला रडताना पाहून पोलिसांनी तिला आधार दिला. तुम्हाला तुमच्या कुटुंबापर्यंत पोहचवू असं आश्वासन दिलं. त्यानंतर झाली शोधाशोध सुरू.
एक हृदयस्पर्शी पुनर्मिलन!
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) February 13, 2023
विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या जवानांनी एका हरवलेल्या, गोंधळलेल्या ६५ वर्षीय महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना एकत्र आणले.#MumbaiCaseFiles pic.twitter.com/oRfMnfBP8Q
विले पार्ले पोलिसांनी तपास केल्यानंतर वृद्ध महिलेची पुन्हा तिच्या कुटुंबासोबत भेट घडवून दिली. आपल्या कुटुंबाला पुन्हा पाहून आजीला अश्रू अनावर झाले. भावूक झालेल्या आजीने आपल्या मुलाच्या वयाच्या पोलिसातच देवदूत शोधला. आजी पोलीस कर्मचाऱ्याच्या पाया पडू लागल्याने पोलिसही काहीवेळ भावूक झाले होते. अखेर आजीने सर्वांना आपल्या उत्तर प्रदेश येथील घरी येण्याचं आमंत्रण दिलं. त्यानंतर ती आपल्या कुटुंबासोबत गेली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

)







