राजा मयाल, प्रतिनिधी ठाणे, 17 जून : गेल्या काही वर्षांपासून ठाणे आणि मुंबईमध्ये अवैधरित्या बांग्लादेशी नागरीक राहत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अनेक गुन्ह्यांमध्येही बांग्लादेशी नागरीकही आढळले आहेत. मात्र, आता जी माहिती समोर येतेय त्यामुळे तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ठाण्यातील भाईंदर भागात ‘बांग्लादेश’ वसलं आहे. होय तुम्ही बरोबर वाचलत. भाईंदरमध्ये एका वसाहतीचं नाव बदलून चक्क बांग्लादेश करण्यात आलं आहे. इतकच नाही तर सरकारी दस्ताएवजावरही बांग्लादेशचा उल्लेख येत आहे. काय आहे प्रकरण? भाईंदर पश्चिम येथील उत्तन-चौक भागात चक्क बांगलादेश नावाचा एक परिसर आहे. या ठिकाणी पूर्वी परराज्यातून आलेले विस्थापित नागरिक राहत असल्यामुळे बांगलादेश असे टोपण नाव पडले होते. मात्र, आता याच नावाची आधार कार्ड, मालमत्ता देयकात आणि चक्क परिवहन बस थांब्यावर नोंद करून मीरा भाईंदर महानगरपालिकाचे अतिहुशार आणि कामात प्रामाणिक असणाऱ्या अधिकार्यांनी या गावाला अधिकृतरीत्या बांग्लादेश हे नाव दिल्याने नव्या वादास सुरुवात झाली आहे. या वादामुळे या गावाने स्वत:चे खरे नाव गमावलं आहे. भाईंदर पश्चिम उत्तन हा समुद्र किनाऱ्या लगतचा परिसर आहे. त्यामुळे या ठिकाणी मच्छिमार नागरिकांची गावे अधिक प्रमाणात आहे. पूर्वीपासूनच या किनाऱ्यावर मासेमारी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये आर्थिक संपन्नता आली होती. त्यामुळेच या भागात बाजार आणि नवनवीन सुखसुविधाची उभारणी जलद गतीने होत गेली. म्हणून हाताला काही कामधंदा मिळण्याच्या हेतूने अनेक नागरिक याठिकाणी येऊ लागले. यात परराज्यातून आलेल्या लोकांचा समावेश आहे. काळानुसार हे लोक उत्तन येथील चौक जवळ असलेल्या मोकळ्या भागात छोटी घरे करून राहू लागले. दरम्यान या काळात इंदिरा गांधीच्या पुढाकारामुळे ‘बांगलादेश’ राज्याची निर्मिती झाली होती. त्यामुळे बांगलादेश हा शब्द तेव्हा प्रचलित झाल्यामुळे स्थानिक मच्छिमारांनी चौक येथील एका छोट्या वस्तीला बांगलादेश असे टोपण नाव दिले होते. वाचा - Video : ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांना शाईफेक करत मारहाण दुर्दैवाने तेव्हापासून याच नावाची बोली ओळख या परिसराला मिळाली होती. मात्र, हे नाव अधिकृतरित्या या परिसराला देण्यात आल्याचे समोर आले आहे. कारण या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या आधार कार्डवर तसेच स्थानिक मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून या लोकांना देण्यात येणाऱ्या मालमत्ता बिलाचे देयकात पत्तामध्ये ‘बांगलादेश’ असाच उल्लेख करण्यात आला आहे. इतकेच नाही तर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या परिवहन सेवेच्या बस थांब्यावरदेखील बांगलादेश असेच लिहण्यात आले आहे. मूळ भारतीय असताना देखील लोकांच्या उच्चारामध्ये बांगलादेशी अशी हाक मारली जात असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन हे नाव बदलावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पालिकेचे राज्यसरकारला पत्र मीरा भाईंदर महानगरपालिकेने फेब्रुवारी महिन्यात या तीन वसाहतींच्या सरकारी कागदपत्रांमध्ये उल्लेख केलेला ‘बांगलादेश’ हा शब्द दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारला पत्र लिहिले होते. भाईंदर (पश्चिम) येथील तीन भागांना सरकारी आणि महापालिकेच्या कागदपत्रांमध्ये ‘बांगलादेश’ असे संबोधले जात आहे. उतान, चौक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानामागील वसाहतींना 35 वर्षांपासून ‘बांगलादेश’ म्हणून संबोधले जात आहे. रहिवाशांच्या शिधापत्रिका, निवडणूक पत्रिका, मतदार यादी, आधार कार्डांवर ‘बांगलादेश’ असा पत्ता आहे. MBMC ने आता सरकारला सरकारी रेकॉर्डमधून ‘बांग्लादेश’ हा शब्द हटवण्यास आणि रहिवाशांना नवीन कागदपत्रे जारी करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी एमबीएमसीने ‘बांगलादेश’ या पत्त्यासह जन्म प्रमाणपत्र जारी केले तेव्हा हा मुद्दा उपस्थित झाला होता. यापूर्वी नालासोपारा (पूर्व) येथील संतोष भुवन येथील रहिवाशांच्या वीज बिलात छोटा काश्मीर हा शब्द वापरल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला होता.