'सुशांत आत्महत्या प्रकरणात आज महाराष्ट्र सरकारला जोरदार धक्का बसेल'

'सुशांत आत्महत्या प्रकरणात आज महाराष्ट्र सरकारला जोरदार धक्का बसेल'

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातलं राजकारण या प्रकरणामुळे ढवळून निघालेलं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे राज्यातील सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातलं राजकारण या प्रकरणामुळे ढवळून निघालेलं आहे. भाजपने या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी लावून धरली आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या निवडणूक प्रभारी पदी निवड करण्यात आली आहे. बिहार भाजप हा मुद्दा लावून धरत होता, अशी चर्चाही या निमित्ताने झाली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी भाजप प्रवक्ते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'आज सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकारला जोरदार धक्का बसेल. लोकभावनेचा विजय होईल आणि सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल,' असं म्हणत राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेना एकटी पडली?

सुशांत आत्महत्या तपास प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गृहकलहदेखील समोर आला आहे. पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून केली आणि त्यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पार्थ अपरिपक्व असून त्याच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नसल्याचं म्हटलं होतं.

अर्थात सीबीआय चौकशीला विरोध नसल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं होतं. तर काँग्रेसचे अस्लम शेख यांनीही सीबीआयला चौकशी करायची असेल तर हरकत नसल्याचं कालच म्हटलं आहे. यामुळे या सगळ्या प्रकरणात शिवसेना एकटी पडली आहे की काय असं चित्र निर्माण झालं. कारण या प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव जोडल्याचा प्रयत्न केला गेल्यानं पक्षात एकच अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे आज या प्रकरणात सुप्रीम कोर्ट चौकशीची जबाबदारी नेमकी कोणाकडे देणार याविषयी राज्यातील सगळ्याच पक्षांचं लक्ष आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या नावाची या प्रकरणात चर्चा सुरू असताना सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीने खुलासा केला आहे. 'आदित्य ठाकरे यांची कधीही भेट घेतली नाही किंवा बोलणे देखील झाले नाही. या प्रकरणात आता सर्व राजकारण करण्यात येत आहे. तिच्या शांततेला दुबळेपणा समजू नका. बेकायदेशीर चौकशीसाठी पुढाकार घेणार नाही,' अशी भूमिका रिया चक्रवर्तीच्या लीगल टीमकडून जाहीर करण्यात आली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 19, 2020, 8:59 AM IST

ताज्या बातम्या