मुंबई, 9 जानेवारी : महागडे परदेशी अंमली पदार्थ भारतात तस्करी केल्याप्रकरणी मुंबई NCB ने करन सजनानी या कोट्याधीशाला अटक केली आहे. NCB चे धडाकेबाज अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली असून याच प्रकरणी अभिनेत्री दिया मिर्जाची माजी मॅनेजर राहिला हिलादेखील NCB ने अटक केली आहे. तसंच राहिला हिची बहीण आणि मित्र करन याला NCB ने ताब्यात घेतलं आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत केसशी संबंधित अंमली पदार्थ तस्कर अनुज केशवानी नावाच्या व्यक्तीला एनसीबीने अटक केली होती. या अनूज केशवानीला करन सजनानी गांजा सप्लाय करायचा. तसंच परदेशातील महागड्या अंमली पदार्थांची तस्करीही हा करन सजनानी करत असल्याचं उघड झालं आहे. करन सजनानी हा एक कोट्याधीश बांधकाम व्यावसायिक आहे. त्याच्याकडून एनसीबीने 75 किलो भारतीय गांजा, तर 125 किलो परदेशी अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
धक्कादायक म्हणजे हा करन सजनानी आर्टिशनल मॅरुआना ज्वाईंट अमेरिकेचे इम्पोर्टेंड बड रिकामे बॉक्स सांगून एअरपोर्टवरुन घेवून आला होता. ज्याचे वजन 1.1 किलो आहे. ज्याची बाजार किंमत 60 ते 70 लाख रुपये आहे. करन सजनानी हा परदेशी अंमली पदार्थ तस्करी करुन आणायचा आणि ते भारतातील गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मेघालय या राज्यात तस्करी करायचा. सजनानी याचे भारतभर अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट आहे ज्याची लिंक इंटर नॅशनल तस्करांशी आहे.
कुणाकुणाला NCB च्या कार्यालयात लावावी लागणार हजेरी?
याच अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांनी अभिनेत्री दिया मिर्जाची माजी मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिण सहिष्ठा फर्निचरवाला या दोघींना ही अटक केली आहे. राहिला ही करन सजनानीला भारतात तस्करी करायला आर्थिक साह्यासोबतच तस्करी करायला मॅन पावर आणि गाड्या पुरवायची.
करन आणि राहिलाच्या अटकेमुळे पुन्हा एकदा बॉलिवूडचे इंटरनॅशनल अंमली पदार्थ तस्करांशी असलेले कनेक्शन समोर आले आहे. NCB सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करन सजनानी याचे ग्राहक मोठं मोठे उद्योगपती आणि बॉलिवूडचे मोठे स्टार असून लवकरच या सर्वांना NCB च्या कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.