शिमग्यानंतर राज्यात उडणार धुरळा; अधिकाऱ्यांच्या बदल्यांसह मंत्रिमंडळातही होणार फेरबदल?

शिमग्यानंतर राज्यात उडणार धुरळा; अधिकाऱ्यांच्या बदल्यांसह मंत्रिमंडळातही होणार फेरबदल?

सध्या राज्यात शिमग्याआधीच राजकिय आरोप-प्रत्यारोपांची रंगपंचमी सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मार्च : सध्या राज्यात शिमग्याआधीच राजकिय आरोप-प्रत्यारोपांची रंगपंचमी सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस यांच्या विरुद्ध भाजपने आक्रमकपणे आरोपांच्या फैरी सुरूच ठेवल्यात. भाजपच्या आक्रमक आरोपांमुळे महाविकास आघाडीत बिघाड होऊन आता राज्य मंत्रिमंडळाचा फेरबदल करण्याचे वारे वाहू लागलेत.

विरोधी पक्ष भाजपने आरोप केलेले वनमंत्री यांनी आधीच त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनाच भाजपने लक्ष केलं आहे. त्यांच्या आरोपांना आता कुठं महाविकास आघाडीने तोडीस तोड उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे. सव्वा वर्षापुर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आलं. त्यावेळी राज्यात आधीच्या भाजप सरकारने नियुक्तं केलेले समर्धक IAS आणि IPS अधिकारी कार्यरत होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर या समर्थक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी काहीच झालेली नाही. त्यामुळे सत्ता जरी महाविकास आघाडीची असली तर प्रशासकिय अधिकारी मात्र भाजपने नियुक्त केलेलेच होते. त्याची झळ आता महाविकास आघाडीला बसू लागलीय.

हे ही वाचा-राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह सुरू होती चर्चा

महाविकास आघीडीतील मंत्र्यांवर एकामागोमाग भाजपचे नेते गंभीर आरोप करत आहेत. त्या सर्व आरोपांची माहिती देणारे सूत्र हे वरिष्ठ अधिकारीच आहेत हे आता सत्ताधारी महाविकास आघीडीतील नेत्यांना कळून चूकलंय. नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागातील खडानखडा माहिती विद्यमान गृहमंत्र्यांच्या आधीच मिळवली होती.  त्यांनी सभागृहात CDR आणि मनसुख हिरण मृत्यू प्रकरण संदर्भातील माहिती जाहीर करून गृहमंत्र्यांना कोंडित पकडलं होतं. त्यामुळे विरोधी पक्ष नेते असुनही देवेंद्र फडणवीस यांचा गृह विभागावर आजही किती वचक आहे याची कल्पना सत्ताधाऱ्यांना आली आहे. त्यामुळे आता गृहविभागावर वचक आणि वकुब निर्माण करेल असा चेहरा देण्याचं महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शिल्पकार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठरवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच येत्या होळी पोर्णिमेनंतर आणि गुढीपाडवा पुर्वी राज्य मंत्री मंडळात महत्वाचे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या मंत्रिमंडळ फेरबदलात कुणाचा पत्ता कट होतोय आणि कुणाची वर्णी मंत्री मंडळात लागतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. नवीन मंत्रिमंडळासोबतच महाविकास आघडी सरकार आता राज्य प्रशासनातील भाजप समर्थक IAS आणि IPS अधिकाऱ्यांनाही बदलणार का..? तेही पहाणं महत्वाचं ठरणार आहे. कारण आता महाविकास आघाडीची जनमानसातील प्रतिमा उंचावणं हे विश्वासू प्रशासनावर देखील अवलंबून असणार आहे. त्यामुळे येत्या शिमग्यानंतर राज्यात कोणता राजकिय धुरळा उडणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: March 25, 2021, 12:27 AM IST

ताज्या बातम्या