मुंबई, 12 जुलै: मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये किती आणि कसा भ्रष्टाचार आहे, याचं पुराव्यासकट उदाहरण एका सामाजिक कार्यकर्त्याने माध्यमांसमोर ठेवले आहे. संदीप येवले या सामाजिक कार्यकर्त्याने बिल्डरने शांत राहण्यासाठी दिलेली लाचेची 1 एक कोटीची रक्कमच मीडियासमोर ठेवलीय. ओंकार बिल्डरने ही लाच दिल्याचा आरोप संदीप येवले यांनी केलाय. एसआरए घोटाळा उघड न करण्यासाठी संदीप येवले यांना तब्बल 11 कोटींची लाच देण्याचे संबंधीत बिल्डरने मान्य केलं असून त्यापैकी 1 कोटींचा पहिला हफ्ता त्यांना मिळाला आहे, तीच लाचेची रक्कम घेऊन ते माध्यमांसमोर हजर झालेत. बिल्डरकडून ही लाच दिली जात असतानाचं स्टिंग ऑपरेशनही संदीप येवले यांनी रेकॉर्ड करून ठेवलंय. विक्रोळी पार्कसाइट भागातल्या हनुमाननगर योजनेत सुरू असलेला भ्रष्टाचार आणि त्यात बिल्डरने सर्वांना कसे मॅनेज केले, याचे पुरावे सुद्धा येवले यांनी पत्रकारांसमोर सादर केलेत. एसआरएचे नुकतेच निवृत्त झालेले कार्यकारी अधिकारी तथा ख्यातनाम लेखक विश्वास पाटील यांच्यावर या आरटीआय कार्यकर्त्याने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. लाचरूपाने मिळालेली रक्कम येवले मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार आहेत. गेली 22 वर्षे विक्रोलीच्या एसआरए आणि इतर योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात लढताना आपण आपले घर विकलं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्यावर 4 वेळा हल्लेही झालेत. या प्रकरणात दाद मागताना खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.