मुंबई, 22 डिसेंबर : कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातील अनुयायी येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे 1 जानेवारी रोजी देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे. मात्र कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एक आढावा बैठक घेण्यात आली होती. या आढावा बैठकीला विविध संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, सर्व विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू विजयस्तंभ परिसरात दाखल पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा याठिकाणी 1 जानेवारी होणाऱ्या विजयस्तंभ शौर्यदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची पाहणी आणि नियोजन करण्यासाठी आज मंगळवारी दुपारी बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर हे विजय स्तंभ परिसरात आले होते. यावेळी त्यांनी विजयस्तंभाचे दर्शन घेऊन स्थानिक पोलिसांशी देखील कार्यक्रमाबाबत चर्चा केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले की, स्थानिक पोलिसांसोबत जी चर्चा झाली ती पॉझिटिव्ह झाली असून या कार्यक्रमचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल आणि पोलिसांचे सहकार्य राहील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.