मुंबई, 13 डिसेंबर : महाराष्ट्र राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगीबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोषाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल ? असा मिश्किल सवाल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
रामदास आठवले हे रंगीबेरंगी नक्षीकाम वाले पोषाख परिधान करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच मिश्किलपणे खुसखुशीत विनोद करण्यातही ते प्रसिध्द आहेत. त्यानुसार मंत्रालयात ड्रेसकोडच्या बातमीवर आठवले यांनीआपल्याला मंत्रालयात प्रवेश मिळेल का असा प्रश्न विचारला आहे.
ड्रेस कोडबद्दल काय आहे सरकारचा निर्णय?
मंत्रालयात काम करणाऱ्या शासकीय कर्मचारी आणि कंत्राट कर्मचाऱ्यांना पोषाखाबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. या नव्या सूचनेनुसार मंत्रालयात आता जीन्स, टी शर्ट घालता येणार नाही. तसंच मंत्रालयात स्लीपर्स वापरू नये, असंही नव्या नियमांत म्हटलं आहे.
महिलांनी साडी, सलवार चुडीदार, पॅन्ट, ट्राउझर आवश्यकता असल्यास दुपट्टा घालवा. तर पुरुषांनी शर्ट पॅन्ट, ट्राउझर घालावे, असं जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमुद करण्यात आलं आहे.