मुंबई 23 सप्टेंबर: मुंबईत पावसाचा धुमाकूळ सुरूच असताना हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि किनारपट्टीच्या परिसरात पुढचे 24 तास हे मुसळधार पावसाचे असतील असं या अलर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. मंगळवारी रात्री विक्रमी पाऊस झाल्याने मुंबईत जागोजागी पाणी तुंबलं होतं. त्याचा आता कुठे निचरा सुरू झालेला असतांनाच हा नवीन इशारा आल्याने प्रशासनाचाही झोप उडणार आहे.
या पावसात वाहतुकीचे तीन तेरा वाजले असून ठिक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढला असून पुढचे ती दिवस असेच वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
रात्रभरापासून मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसानं रात्री जोर धरला आणि मुंबईकरांची दाणादाण उडाली. लोकल सेवा पासून रस्त्याच्या वाहतुकीपर्यंत आणि दुकानांपासून ते घरापर्यंत अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली.
अत्यावश्यक सेवा वगळता आज मुंबई राहणार बंद
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.