मुंबई, 14 जुलै : पुणे जिल्ह्यातील (Pune district) भोसरी एमआयडीसीतील जमीन व्यवहार प्रकरणात (Bhosari Land Case) ईडीकडून एकनाथ खडसेंची (Eknath Khadse) चौकशी चार दिवसांपूर्वी झाली. त्यानंतर आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन राज्य सरकारने झोटिंग समिती नेमली होती आणि त्याचा एक खळबळजनक अहवाल समोर आल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या झोटिंग समितीत एकनाथ खडसे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिलालेल्या माहितीनुसार, झोटिंग समितीची खडसेंना क्लीन चिट नव्हती. एकनाथ खडसेंनी गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच खडसेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांनी मंत्रिपदावर राहू नये असंही समितीचा अहवाल सांगत आहे.
एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांना झोटिंग समितीने क्लीन चिट दिली असल्याची आधी माहिती समोर येत होती. त्यानंतर आता एकनाथ खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीत आल्यावर या चौकशी समितीचा अहवालच गहाळ झाला असं वृत्त मंगळवारी समोर आलं. एकनाथ खडसे यांच्या चौकशीचा अहवाल गहाळ झाल्याने विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आता हा अहवाल सापडला असल्याचं बोललं जात आहे.
चंद्रशेखर बवानकुळेंची प्रतिक्रिया
मीडियाचे आभार मानले पाहिजे की त्यांच्यामुळे झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाल्याचा आणि नंतर मीडियाच्या दबावामुळे तो पुन्हा मिळाल्याचं समोर आलं. नाही तर या सरकारला एकनाथ खडसे यांच्या मानगुटीवर बसून त्यांचा आणखी नुकसान करण्याचा डाव होता अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath khadse