मुंबई, 03 एप्रिल : मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा प्रकोप पुन्हा एकदा प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळत आहे. रोजच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून हा आकडा आता रोज 5 ते 9 हजाराच्या घरात पोहोचला आहे. या सर्व परिस्थितीमुळे लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं लॉकडाऊनपूर्वी गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दी होत असल्याचं चित्र आहे. शनिवारी सकाळ पासूनच लोकमान्य टिळक टर्मिनसवर अनेक प्रवाशांची गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र ज्यांचं आरक्षण आहे त्यांनाच प्लॅटफॉर्म वर सोडण्यात येत आहे. यात उत्तर भारतील उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनामुळे गेल्यावर्षी मार्च महिन्यातच रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळं अनेकांना सुट्यांमध्ये गावीही जाता आलं नव्हतं. यंदाही काहीशी तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यानं अनेकांनी यापूर्वी आरक्षण करून ठेवलं आहे. त्यामुळं काही गाड्यांचं अगदी मे महिन्यांपर्यंतचे आरक्षणदेखील फुल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. हे ही वाचा- ‘साथ हवी, राजकारण नको’, Lockdown च्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचं आवाहन सुट्यांसाठी किंवा पुढच्या महिन्यांमध्ये गावी जाणाऱ्यांची संख्या तर आहेच. पण सध्या दोन तीन दिवसांमध्ये राज्य सरकार लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेणार याबाबतही अनेकांच्या मनात अनिश्चितता आहे. त्यामुळंच काही लोक आताच गावी परतण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं तत्काळ सेवेत का होईना आरक्षण करून गड्या आपला गाव बरा म्हणतं गाव गाठण्याचा प्रयत्न अनेक नागरिक करत आहेत. गेल्यावेळी लॉकडाऊन केल्यानंतर नागरिकांना आणि प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार मधील नागरिकांना परत जाण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अत्यंत भीषण अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. यावेळीही तशी वेळ येऊ नये म्हणून काही लोक आधीच गावी निघाले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी असल्याचे चित्र दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.