जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / आर्थिक राजधानीत नागरिकांच्या जीवाशी खेळ, मुंबईतलं धक्कादायक वास्तव

आर्थिक राजधानीत नागरिकांच्या जीवाशी खेळ, मुंबईतलं धक्कादायक वास्तव

वाकोल्यातील भीषण परिस्थिती

वाकोल्यातील भीषण परिस्थिती

वाकोल्यातून मिठी नदी वाहते. या नदीची सध्याची स्थिती नाल्याप्रमाणे झाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

ऋचा कानोलकर, प्रतिनिधी मुंबई, 19 एप्रिल : मुंबईत सध्या अनेक ठिकाणी पाणीकपात सुरू आहे. पण सांताक्रूझचा वाकोला परिसर गेल्या वर्षभरापासूनच पाण्यासाठी तहानलेला आहे. नळ आहेत पण पाणी नाही, पाणी आलंच तर तेही दूषित, अशी परिस्थिती रहिवाशांवर ओढावली आहे. पाणीप्रश्नावरून आता वाकोल्यातील रहिवासी आंदोलनात उतरले आहेत. नेमकी येथील परिस्थिती कशी आहे, याबाबत न्यूज 18 लोकमतने याबाबतच आढावा घेतला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट एक आलिशान ठिकाण म्हणून ओळखलं जातं. मात्र, या एअरपोर्टला लागूनच असलेल्या भिंतीपलीकडे रहिवाशांना पिण्यायोग्य पाणीही मिळेना झाले आहे. गेले वर्षभर सांताक्रूझमधील वाकोल्यात दूषित पाणी येत आहे. जलवाहिन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय, नवी जलवाहिनी लावायची असल्यास त्याचंही काम वेगानं पार पाडलं जातं. मात्र, या जलवाहिन्यांतून पिण्यायोग्य पाणी येत नाही, अशी परिस्थिती आहे. एअरपोर्ट आणि संपूर्ण वस्ती, वाकोला

एअरपोर्ट आणि संपूर्ण वस्ती, वाकोला

वाकोल्यातून मिठी नदी वाहते. या नदीची सध्याची स्थिती नाल्याप्रमाणे झाली आहे. सर्वत्र कचऱ्याचं, प्लास्टिकचं साम्राज्य आणि त्यात सांडपाण्याची भर पडल्याने ही मिठी नदी दूषित झालेली आहे. या नदीवाटे पालिकेने बसवलेल्या जलवाहिन्या जातात. अनेक ठिकाणी या वाहिन्यांना छिद्र गेल्याने, भेगा पडल्याने दूषित पाणी जलवाहिनीत मिसळते आणि तेच पाणी घराघरात पोहोचते. नवी जलवाहिनी लावल्यास शुद्ध पाणी येईल, या आशेने अनेकांनी जलवाहिन्या बसवून घेतल्या. मात्र, त्यातून दूषित पाणी येतं. या दूषित पाण्यानंच भांडी घासून त्यात अन्न शिजवावं लागतं आहे. निवडणुकीव्यतिरिक्त कुणीही इथं फिरकत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे. बिलं भरूनही आम्हाला दूषित पाणीच प्यावं लागणार असेल तर नेत्यांनी मतं घ्यायला इथं फिरकूही नये, असा रहिवाशांचा आक्रोश आहे. वर्षभरात या दूषित पाण्यामुळे अनेकांना आजारांना सामोरं जावं लागलं, त्वचेचे रोगही झाले. मुंबईत राहूनसुद्धा पिण्याचं पाणी विकत घेण्याची वेळ वाकोला रहिवाशांवर आली आहे. एअरपोर्टच्या भिंतीजवळून 150 मिलीमीटर व्यासाची, 300 मीटर लांबीची MDPE पाईपलाईन बसवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. मुंबई महापालिकेकडून 2 इंचाच्या 2 नवीन जलवाहिन्यांचं काम सुरू करण्याचं आश्वासनही दिलं गेलं. इतकंच नाही तर भूमिगत टाकी बनवून पंपाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला. मात्र, सर्व आश्वासनं गेली वर्षभर कागदावरच आहे. आता याला कंटाळून सर्व रहिवासी आंदोलनात उतरणार आहेत. मुंबई शहर आणि उपनगरच्या रहिवाशांना सध्या पाणीटंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतं आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची समस्या निर्माण झाल्याने मुंबईकर त्रस्त आहेत. प्रश्न पालिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईत नगरसेवकही नाहीत. मग सर्वसामान्यांनी तक्रार करायची तरी कुणाकडे हा सवाल रहिवासी विचारत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात