मुंबई, 25 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्राने पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे. यामध्ये 7 जणांना पद्म विभूषण, 10 जणांना पद्म भूषण आणि 102 जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. (Padma Award announced) पद्मभूषण या विभागात महाराष्ट्रातील रजनीकांत श्रॉफ यांचा समावेश आहे. तर पद्मश्री पुरस्कारामध्ये फारेपारधी समाजासाठी काम करणारे गिरीश प्रभूणे, सिंधुताई सपकाळ, जसवंतीबेन पोपट, नामदेव कांबळे, परशूराम गंगावणे यांचा समावेश आहे. तसंच मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रसिद्ध पार्श्वगायक एस.पी.बालासुब्रमण्यम यांना देण्यात आला आहे. तर तरुण गोगोई आणि रामविलास पासवान, केशुभाई पटेल या राजकीय नेत्यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जपानचे पूर्व पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म विभूषण, तर दिवंगत गायक एसपी बालासुब्रमण्यम (मरणोत्तर) यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
दरवर्षी प्रजासत्तक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांचा यावेळी सन्मान केला जातो. यामध्ये मरणोत्तरही पुरस्कार दिले जातात. यंदाच्या वर्षीही सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांना सन्मानित करण्यात आलं आहे.