मुंबई, 05 जून: दीड वर्षापूर्वी कोरोना विषाणूने (Corona virus) देशात शिरकाव केल्यापासून शिक्षण क्षेत्राचे बारा वाजले आहेत. दरम्यानच्या काळात शाळा, महाविद्यालये बंद ठेवल्याने अनेक विद्यार्थांना शाळा सोडण्याची वेळ आली आहे. काही खाजगी आणि सरकारी शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा (Online Education) पर्याय अवलंबला आहे. पण यामध्ये अनेक अडचणी आहेत. अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट फोन अथवा लॅपटॉप (Smart phone and laptop) नाहीत. तर काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोनला रिचार्ज (data recharge) करण्यासाठी पैसेही नाहीत. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावं लागतं आहे.
याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेनं विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावं, यासाठी प्रशासनाने विविध योजना तयार करत आहे. आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना डाटा पॅक खरेदी करता यावा, यासाठी महापालिका प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यात 1 हजार रुपये जमा करणार आहे. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितलं आहे.
कोरोना विषाणूची संभाव्य तिसरी लाट ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात येणार असल्याचा धोका आरोग्य तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. अशातच कोरोना विषाणूची तिसरी लाट लहान मुलांसाठी अत्यंत घातक ठरणार असल्याचा इशाराही तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आणखी काही महिने शाळा सुरू होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महापालिकेनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा-सोमवारपासून तुमच्या जिल्ह्यात काय- काय होणार अनलॉक, वाचा सविस्तर
ही योजना पहिल्या सहा महिन्यांसाठी असणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मोबाईल नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठीही उपाययोजना करणार असल्याचं सुतोवाचही बांगर यांनी केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Online exams