मुंबई, 12 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut Latest Update) तिचं सौंदर्य, अभिनय यासाठी जितकी प्रसिद्ध आहे तितकीच, किंबहुना त्यापेक्षा अधिक आपल्या बेधडक वागण्या-बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे ती चर्चेत असते. सध्याही तिच्या एका वादग्रस्त विधानामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अलीकडेच तिनं एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. तिचं हे वक्तव्य अनेकांना आवडलं नसून, अनेकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
विरोधी पक्षासह भाजपमधील काही नेत्यांनी देखील कंगनाच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनी देखील कंगनाला फैलावर घेत कानउघडणी केली आहे. त्यावर कंगनानंही प्रत्युत्तर दिलं असून, सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध पेटलं आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) देखील मागे राहिले नाहीत. त्यांनी बोचऱ्या शब्दांत कंगनावर टिकास्त्र सोडलं असून तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा-'कंगनाकडून पद्मश्री परत घ्या', विरोधी पक्षांसह भाजप नेत्यांचाही संताप
मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, 'कंगना राणौतच्या म्हणण्यानुसार, 'देशाला 1947 मध्ये जे स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती, खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळालं. कंगुबाईने केलेलं हे वक्तव्य देशासाठी बलिदान देणाऱ्या तमाम देशभक्तांचा अपमान असून या बाईवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.' असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी केलं आहे. यासोबतच त्यांनी कंगनाच्या या विधानावर, मौन बाळगणाऱ्या भाजपच्या अनेक नेत्यांवरही टिकास्त्र सोडत बोचरा सवाल केला आहे.
कंगना रानौत च्या म्हण्यानुसार देशाला 1947 मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाले. ह्या कंगुबाईने केलेलं हे वक्तव्य देशासाठी बलिदान देणाऱ्या तमाम देशभक्तांचा अपमान असुन या बाईवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.@CMOMaharashtra@Dwalsepatil
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 11, 2021
दुसऱ्या एका ट्विटमध्ये मिटकरी यांनी म्हटलं की, 'कंगनाच्या सौंदर्यापुढे काहींना स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांचा अपमानही जाणवत नाही का? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणारे मोदी व महाराष्ट्रातील त्यांचे देशभक्त नेते अजून पर्यंत का गप्प आहेत?' असा बोचरा सवाल मिटकरी यांनी विचारला आहे. कंगनाच्या या विधानानंतर राज्यातील वातावरण तापताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Kangana ranaut