कोरोना झाल्यानंतरही घरीच उपचार घेणाऱ्यांची कशी घेतली जाते काळजी? जाणून घ्या

कोरोना झाल्यानंतरही घरीच उपचार घेणाऱ्यांची कशी घेतली जाते काळजी? जाणून घ्या

औषधोपचार हे सुयोग्‍य प्रकारे व्‍हावेत, या‍करिता अशा रुग्‍णांचा नियमितपणे पाठपुरावा करणे गरजेचे असते.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट : कोविड-19 बाधित ज्‍या रुग्‍णांना गृह विलगीकरणाची अनुमती देण्‍यात आली आहे, अशा रुग्‍णांची परिस्थिती व त्‍यांच्‍यावर करण्‍यात येत असलेले औषधोपचार हे सुयोग्‍य प्रकारे व्‍हावेत, या‍करिता अशा रुग्‍णांचा नियमितपणे पाठपुरावा करणे गरजेचे असते. त्‍याचबरोबर या रुग्‍णांपैकी आवश्‍यक त्‍या रुग्‍णांना औषधोपचार करणेही गरजेचे असते. या अनुषंगाने या रुग्‍णांच्‍या स्‍तरावर दररोज दुरध्‍वनीद्वारे पाठपुरावा करण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पुढाकाराने ‘प्रकल्‍प मैत्री’ या प्रकल्‍पाची सुरुवात जुलै 2020 मध्‍ये करण्‍यात आली. ‘प्रकल्‍प मुंबई’ या स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या आणि पोर्टीया मेडिकल या संस्‍थेच्‍या सहकार्याने राबविण्‍यात आलेल्‍या या प्रकल्‍पांतर्गत आजवर 21 हजार 250 रुग्‍णांची संपर्क साधण्‍यात आला आहे. तर यापैकी 14 हजार 800 रुग्‍णांवरील उपचार प्रक्रिया पूर्ण करण्‍यात आली आहे.

या प्रकल्‍पाबाबत बोलताना महापालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की, वैद्यकीय उपचार केंद्रात असणाऱ्यांसह गृहविलगीकरणात असलेल्‍या प्रत्‍येक रुग्‍णांपर्यंत कोविड उपचार पोहचावेत, यासाठी महापालिका सातत्‍याने व अथकपणे प्रयत्‍नरत आहे. या अनुषंगाने ‘प्रकल्‍प मुंबई’ या स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या सहकार्याने आणि पोर्टीया हेल्‍थ केअर या अंमलबजावणी भागीदारांच्‍या सहभागासह ‘मुंबई मैत्री’ हा प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे. या प्रकल्‍पातून प्राप्‍त झालेली शिकवण आणि अनुभव यांची पुढील तीन महिन्‍यांतील माहिती ही इतर शहरांना आणि जिल्‍हा प्रशासनांना कळविण्‍यात येणार आहे.

प्रकल्‍प ‘मुंबई मैत्री’ बाबत महत्‍वाचे ठळक मुद्दे पुढील प्रमाणे:-

- गृहविलगीकरणात असलेल्‍या कोविड रुग्‍णांशी प्रशिक्षित आरोग्‍य कर्मचाऱयांद्वारे नियमितपणे दूरध्‍वनी संवाद साधला जातो. या अंतर्गत प्रामुख्‍याने उपचार विषयक पाठपुरावा घेणे, तसेच रुग्‍ण व त्‍याच्‍या कुटुंबियाची आरोग्‍य परिस्थिती जाणून घेतल्‍या जातात.

- रुग्‍ण व त्‍याच्‍या कुटुंबिय मानसिक तणावात असल्‍याचे जाणवल्‍यास त्‍यांना मानसिक आरोग्‍य विषयक समुपपदेशकांशी व भावना विषयक तज्‍ज्ञांशी संवाद साधण्‍याची सुविधा 1800-102-104 या क्रमांकावर उपलब्‍ध करुन देण्‍यात येते.

- रुग्‍णालयातून सुट्टी देण्‍यात आलेल्‍या, परंतु 7 दिवसांसाठी गृहविलगीकरणाची शिफारस करण्‍यात आलेल्‍या रुग्‍णांच्‍या स्‍तरावर देखील या प्रकल्‍पांतर्गत नियमित पाठपुरावा करण्‍यात येत आहे.

- या प्रकल्‍पांतर्गत बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या विभागस्‍तरीय नियंत्रण कक्षाशी नियमितपणे समन्‍वय साधला जातो. तसेच दूरध्‍वनी पाठपुरावा दरम्‍यान एखादया रुग्‍णामध्‍ये कोविड लक्षणे असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास त्‍याबाबत नियंत्रण कक्षाला कळविले जाते. जेणेकरुन आवश्‍यकतेनुसार रुग्‍णवाहिकेची / रुग्‍णशैय्येची व्‍यवस्‍था यथायोग्‍य प्रकारे करता येईल. ज्‍या रुग्‍णांचे वय 55 वर्षांपेक्षा अधिक आहे किंवा ज्‍यांना इतर काही आजार आहेत (Co-morbidities), त्‍यांच्‍याबाबत विशेष लक्ष देऊन पाठपुरावा केला जातो.

- महापालिकेच्‍या विभागीय नियंत्रण कक्षाव्‍दारे करण्‍यात येत असलेल्‍या कार्यांना पूरक ठरणारी कार्ये प्रकल्‍प ‘मुंबई मैत्री’ अंतर्गत करण्‍यात येत आहेत. ज्‍यामुळे नियंत्रण कक्षावरील कामाचा ताण कमी होण्‍यास मदत झाली आहे. परिणामी विभागीय नियंत्रण कक्षातील कर्मचाऱयांना रुग्‍णशैय्या व्‍यवस्‍थापन, रुग्‍णांच्‍या निकट संपर्कातील व्‍यक्‍तींचा शोध घेणे (Patient contact tracing) इत्‍यादी बाबींवर विशेष लक्ष देणे शक्‍य झाले आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 28, 2020, 11:45 PM IST

ताज्या बातम्या